Advertisement

सुशांत तू का झालास शांत?

एक हसतमुख तरुणाचा असा शेवट लोकांना सहन झाला नाही. सुशांतच्या आत्महत्येचं कारण नैराश्य असल्याचं नंतर बोललं जात आहे.

सुशांत तू का झालास शांत?
SHARES

२०२० साल धक्क्यांवर धक्के देत आहे. हे साल इतिहासात काळकुट्ट साल म्हणून नोंदवलं जाईल यात वादच नाही. कोरोनाने हे वर्ष उद्धस्त करून टाकलं.. त्याचबरोबर बॉलीवूडला हे वर्ष कमालीचं दुर्दैवी ठरलं. एका पाठोपाठ एक अशा महान दिग्गजांचा  धक्कादायक अंत झाला. त्यात काल अवघ्या ३४ वर्षाच्या सुशांत सिंह राजपूत याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तुम्हा आम्हाला हा मोठा धक्का होता. इतका की कोरोनाच्या भडक बातम्यांनी लोकांनी बंद पाडलेले टीव्ही क्षणार्धात चालू झाले. एक हसतमुख तरुणाचा असा शेवट लोकांना सहन झाला नाही. सुशांतच्या आत्महत्येचं कारण नैराश्य असल्याचं नंतर बोललं जात आहे.

नेमकं काय कारण होत हे नंतर कदाचित काळेलही. पोलिसांचा तपास चालू आहे. पण या निमित्ताने डिप्रेशन नावाचा शब्द पुन्हा चर्चेत आला. आला तोही नकोत्या वेळी आला, कोरोनाच्या काळ्याकुट्ट गर्द छायेत आला. एखाद्या स्टार माणसाने जीव दिला, आत्महत्या केली की  डिप्रेशन हा शब्द हा आजार अधूनमधून डोकं वर काढत असतो. त्यावर जोरदार चर्चा होते. पुढे लोक विसरून जातात. पार्ट कुणी गळफास लावून घेतला की पुन्हा चर्चा. कुणी जीव दिला की परत चर्चा, परीसंवाद वगैरे वगैरे. या सगळ्या चर्चा तेवढ्या पुरत्या असतात. पुढे त्यातून काही निष्पन्न होत नाही. सुधारणा होत नाही. बऱ्याचदा अशा मानसिक आजारी व्यक्तींना आपण वेड्यात काढतो. अशा लोकांना टाळतो. खरं तर त्यांना आधार हवा असतो. मनातला अंधार पुसायचा असतो. मनाने ही माणसे खचलेली असतात. हे जग आता आपल्यासाठी नाहीय अशी भयंकर जाणीव त्यांना झालेली असते. त्यांची सहनशक्ती संपलेली असते. अशी बरीच करणे असतात.

सुशांत आपल्या मार्गाने शिखरापर्यंत पोहचला होता. कमी वयात पोहचला होता. आणि हे असे अचानक धक्कादायक  घडले. कुठे गेली तुमची प्रसिद्धी? कुठे गेला तुमचा पैसा. लौकिक? मग असे कितीतरी प्रश्न मागे राहतात. या सगळ्या गोष्टी तुमचा जीव गेल्यावर कुचकामी ठरतात. डिप्रेशन हा मानसिक आजार आहे त्यावर डॉक्टरांचा सल्ला उपयोगी पडतो. यावर औषध उपलब्ध  आहेत. शिवाय संवादातून, समुपदेशातून यावर नक्की  मात करता येते. मग सुशांत कुठे चुकला? नंतर कळले की डिप्रेशनवर तो गोळ्या घेत होता. पण गेले सहा महिने त्याने गोळ्या बंद केल्या होत्या. का? कशासाठी? बरेच प्रश्न निर्माण करून सुशांत निघून गेला. खरंतर या आजाराची लक्षण इतर आजारासारखी दिसायला लागतात. या आजाराच्या व्यक्ती इतरांशी हळूहळू कमी बोलायला लागतात. एकटे राहायला लागतात. त्यांना झोप कमी येते. या आजाराच्या व्यक्ती चिडचिड करत राहतात. अशी बरीचशी लक्षणं आधी दिसायला लागतात. तेव्हाच खरंतर यांची काळजी घ्यायला हवी. पण आपल्याकडे तसं फार होताना दिसत नाही. बऱ्याचदा अशा लोकांची टिंगल टवाळी होताना दिसते. नाहीतर लोक याना टाळताना दिसतात. शिवाय लोक काय म्हणतील हा नेहमीच प्रश्न आहेच. who च्या एका रिपोर्टनुसार भारतात जवळपास ७% लोक मानसिक आजारी असल्याचं कुठेतरी वाचलं होतं.

डिप्रेशनबद्दल स्वतःहून बोलणारे आपल्याकडे कमीच आहेत. अलीकडे जेव्हा दीपिका पदुकोणने आपण  डिप्रेशनमध्ये होतो असं जाहीर केलं तेव्हा बऱ्याच लोकांना धक्का बसला होता. त्यावर खूप चर्चा झाली होती. काहींना वाटलं हिला काय कमी आहे? कुणाला वाटलं हे तीच नाटक तर नाही ना ? असं बरच काही घडलं होत तिच्या बाबतीत. पण दीपिकासारखी हिम्मत सगळ्यांनाच नाही दाखवता येत. काल सुशांतच्या मृत्यूवर प्रतिक्रिया देताना ती मीडियावर संतापली. सुशांतच्या आत्महत्येच्या बातम्यांवर तिने आक्षेप  घेतला. मीडियामध्ये commited suicide अश्या आशयाच्या बातम्या आल्याने तिने संताप व्यक्त केला. ती म्हणाली की जे गुन्हेगार असतात ते गुन्हा commit करतात. माणूस suicide commit करत नाही. आत्महत्येमुळे त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे लोकांच्या आत्महत्येला commit असा उल्लेख करू नका. असो. तर हे असं आहे. काल सोशल मीडियावर तर आत्महत्येवर विनोदही सुरु होते. या वरून कळतंय की आपण या मानसिक आजाराबाबत किती जागरूक आहोत. fb वरच कुणीतरी लिहिलं होत. सुशांतने मरण्याआधी एकदा त्याचाच m.s. dhoni सिनेमा पहिला असता तर स्वतःच्याच प्रेमात पडून तो नव्याने जन्माला असता..!

मृत्यूच्या आधल्या रात्री उशिरा सुशांतने आपल्या जवळच्या एका सहकलाकाराला फोन केला होता. पण त्याने तो उचलला नाही. दुसऱ्या दिवशी टीव्हीवर या मित्राने तशी कबुलीही दिली. तो म्हणत होता फोन न घेण्याची चूक मला आता आयुष्यभर सातवेल. मानसिक आजारी असलेल्या अशा लोकांना काहीतरी सांगायचं असतं. त्यांना जवळची व्यक्ती हवी असते जिच्यासमोर आपण रडू शकतो. आज प्रत्येकाने जरी तो मानसिक आजारी नसतानाही त्याने आपले मन कुठेतरी मोकळं करायला हवं. आजच्या धकाधकीच्या जीवघेण्या स्पर्धेच्या जीवनात ते गरजेचं आहे. नाहीतर who ची टक्केवारी ७ % वरून कधी ७०% झाली याचा थांगपत्ताही लागायचा नाही. नाहीतरी आता येणारे पुढचे दिवस वाईटच आहेत. कोरोनामुळे कितीतरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. जगभरात करोडो लोक बेरोजगार होत आहेत. मोठं मोठी आर्थिक संकट आता आपल्या उंबरठ्याबाहेर उभी आहेत. मित्रांनो, पैसा प्रसिद्धी आज आहे उद्या नाही. ती परत मिळवताही येईल. पण आयुष्य एकच आहे. ते मात्र गमावू नका.. ! आत्महत्या करणारा सुशांतच आपल्या छिछोरे या सिनेमात म्हणाला होता  'जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इंपॉर्टेन्ट है तो वो है खुद की जिंदगी'…!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा