• द कपिल शर्मा ‘टि्वट’ शो
  • द कपिल शर्मा ‘टि्वट’ शो
SHARE

मुंबई – ‘कॉमेडी नाईट्स वुईथ कपिल’ आणि नंतर ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून लोकप्रिय झालेला कपिल शर्मा आता चांगलाच अडचणीत सापडलाय. पालिकेनं कपिलच्या अंधेरीतील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवलाय. हा मुद्दाही या निमित्ताने पुढे आला.

कुठून झाली वादाला सुरुवात?

कपिल शर्माने सकाळी पंतप्रधानांच्या नावे टि्वट करत मुंबई पालिकेतील अधिका-याला आपण 5 लाखांची लाच दिल्याचं सांगितलं आणि द ग्रेट कपिल शर्माज टि्वट शो सुरू झाला. त्याच्या या टि्वटची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेला याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

कशा उमटल्या प्रतिक्रिया?
कपिलने टि्वट करताच मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने या प्रकरणाला चांगलाच राजकीय रंग चढला. मुख्यमंत्र्यांना सेलिब्रिटींच्या टि्वटवर टि्वट करायला वेळ आहे, पण पोलिसांवर होणा-या हल्ल्याबद्दल, मुंबईतल्या खड्ड्यांबद्दल बोलायला, त्याविरोधात कारवाई करायला वेळ नाही असा आरोप मनसेनं केला. मनसेचे पालिका गटनेते संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवरच थेट निशाणा साधला.

कसा चढला राजकीय रंग?
मनसेनं याबाबत आक्रमक भूमिका घेताच शिवसेनाही याप्रकरणी आक्रमक झाली. तर भाजपचे नेते राम कदम यांनी थेट बीकेसी सायबर सेल गाठत कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल केली. दुपार होताहोता कपिल शर्माज ट्विट शो चांगलाच रंगला. टि्वटची दखल घेतल्याचं सांगत कपिलने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तर मनसेच्या पदाधिकार्यांनीही आपल्याकडून पैसे मागितल्याचा आरोप करत मनसेवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. 
या आरोपांनंतर मनसे अधिकच आक्रमक झाली. कपिलने पदाधिका-यांची नावं जाहीर करावीत किंवा माफी मागावी अन्यथा त्याला मुंबईत शूटींग करु देणार नाही अशी इशारावजा धमकीच मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद दिली.

मुंबई पालिकेनं काय केलं?
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिकाही कामाला लागली. दुपारी पालिकेने कपिलला पत्र पाठवत त्या अधिका-याचं नाव जाहीर करण्याबरोबरच लाच मागितल्याचे पुरावे सादर करण्याची मागणी केली. तसेच याविषयी तात्काळ पत्रकार परिषद घेत भ्रष्टाचाराचे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं जाहीर केलं.

कपिलच्या अनधिकृत बांधकामाचा वाद...
अंधेरीतील म्हाडा कॉलनीतील बंगल्याबाहेर कपिलने 16 फुटांचं अनधिकृत बांधकाम केलं असून या बांधकामाविरोधात पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळेच कपिल नाराज झाला आणि त्याने हे टि्वट केल्याचे आरोप होऊ लागले. आता पालिका आकसातून कपिलविरोधातली कारवाई तीव्र करेल अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या