Advertisement

‘वाडा’ नाट्यत्रयीचे मोजकेच ११ प्रयोग!


‘वाडा’ नाट्यत्रयीचे मोजकेच ११ प्रयोग!
SHARES

‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’  ही महेश एलकुंचवार लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेली नाट्यत्रयी! या नाट्यत्रयीतून भारतीय संस्कृतीची अनेक रूपं व्यक्त होतात. यातलं ‘युगान्त’ हे तिसरं नाटक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी रसिकांसाठी १ ऑक्टोबरला घेऊन येणार आहेत. जीवनानुभव देणाऱ्या या तीनही नाटकांचा सलग ९ तासांचा अविस्मरणीय नाट्यानुभव यानिमित्तानं प्रेक्षकांना लवकरच घेता येईल. यासंबधी अधिक माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.



याप्रसंगी बोलताना चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ करत असताना माझ्यावर थोडसं दडपण होतं. हे नाटक जरी चांगलं असलं, तरी आताच्या काळात चालेल का? असा प्रश्न माझ्या मनात होता. पण ‘वाडा चिरेबंदी’ व ‘मग्न तळ्याकाठी’ला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून लक्षात आलं की, 35 वर्षांपूर्वी एका नाटककारानं लिहिलेलं, महाराष्ट्रातल्या एका कुटुंबात घडणारं हे नाटक आजही प्रेक्षकांना भिडतंय. याचा अर्थ ते काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक आहे. ‘युगान्त’ आणल्यानंतर हे नाट्यवर्तुळ पूर्ण होईल, या उद्देशानं ही ‘नाट्यत्रयी’ प्रेक्षकांसाठी रंगमंचावर आणत आहोत.



या ‘नाट्यत्रयी’चा पहिलावहिला प्रयोग रविवार १ ऑक्टोबर २०१७ ला  रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे या ‘नाट्यत्रयी’चे मोजकेच ११ प्रयोग होणार असून ते दर रविवारी सादर होतील. मुंबई-पुण्याशिवाय महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणीही प्रयोग करण्याचा निर्माते व दिग्दर्शकांचा मानस आहे.

बदलती एकत्र कुटुंब पद्धती, बदलता काळ, बदलते नातेसंबंध, भावभावनांचा भव्यपट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.



निवेदिता सराफ, भारती पाटील, वैभव मांगले, प्रसाद ओक, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, अजिंक्य ननावरे, दीपक कदम, विनिता शिंदे, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर, पूर्वा पवार, राम दौंड आणि बालकलाकार स्वानंद शेळके या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.



हेही वाचा

हिना पांचालचं मराठीमध्ये हॉट आयटम साँग!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा