Advertisement

ऋषी कपूर यांचे गाजलेले चित्रपट


ऋषी कपूर यांचे गाजलेले चित्रपट
SHARES

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. गुरूवारी सकाळी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून माहिती दिली. ऋषी कपूर यांनी ७०-८०चे दशक आपल्या मनमोहक भूमिकांनी गाजवले आहेत. वेगवेगळ्या चित्रपटातील त्यांच्या भूमीका आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ऋषी कपूर यांनी १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. परंतु, १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटानं ऋषी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली.

अभिनेते ऋषी कपूर व अभिनेत्री नीतू सिंग यांची पडद्यावरील जोडी लोकप्रिय ठरली. ऋषी यांनी नीतू सिंगबरोबर १० हून अधिक चित्रपट केले आहेत. त्यानंतर हीच अभिनेत्री ऋषी यांची लाइफ पार्टनर झाली. ऋषी कपूर यांनी नातू सिंगबरोबर १९८० मध्ये विवाह केला. लग्ना अगोदर बरेच चित्रपट त्यांनी पत्नी नीतूसोबत केले. परंतु, लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये ‘दो दुनी चार’ सिनेमात एकत्र काम केलं.

ऋषी कपूर यांचे 'लैला मजनू', 'रफूचक्कर', 'सरगम', 'कर्ज', 'प्रेम रोग', 'नगिना, 'हनिमून', 'चांदनी', 'हीना', 'खेल खेल मै', 'अमर अकबर अँथनी', 'हम किसीसे कम नही', 'बदलते रिश्ते', 'सागर', 'बोल राधा बोल', 'दामिनी', 'दिवाना' असे एकापेक्षा एक चित्रपट गाजले आहेत. ‘कुछ तो है’ या सिनेमात ऋषी कपूर यांनी साकारलेला ‘सायको किलर’ चांगलाच गाजला. त्यानंतर हृतिक रोशनसोबत अग्निपथ चित्रपटात त्यांनी रंगवलेला ‘रौफ लाला’ हा खलनायक भाव खाऊन गेला होता.

'ये हे जलवा', 'हम तुम', 'फना', 'नमस्ते लंडन', 'लव आज कल', 'पटियाला हाऊस' यासारख्या चित्रपटात त्यांनी सहकलाकार म्हणून काम केलं. 'हाऊसफुल 2' या चित्रपटात त्यांनी भाऊ रणधीर कपूर सोबत काम केलं. ‘खजाना’ या चित्रपटानंतर हा दोन्ही भावांचा एकमेव चित्रपट होता.

ऋषी कपूर यांच्यासाठी किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा अनेक दिग्गज गायकांनी गाणी गायली. विशेष म्हणजे ही सर्वच गाणी चांगलीच गाजली. ऋषी कपूर यांनी ‘खुल्लम खुल्ला’ या नावाने लिहिलेले आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. 102 नॉट आउट या चित्रपटात त्यांनी साकारलेली वृद्धाची भूमिका लोकप्रिय ठरली होती. २०१९ मध्ये ‘द बॉडी’ हा त्यांचा प्रदर्शित झालेला अखेरचा चित्रपट ठरला.

‘मेरा नाम जोकर’ या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. बॉबी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं २००८ मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचिवमेंट पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. १९९९मध्ये त्यांनी ‘आ अब लौट चले’ हा चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात राजेश खन्ना, ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना यांनी काम केलं होतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा