Advertisement

'माल्टा'मध्ये भरणार ‘माल्टा-इंडिया फिल्म फेस्टिव्हल’


'माल्टा'मध्ये भरणार ‘माल्टा-इंडिया फिल्म फेस्टिव्हल’
SHARES

'माल्टा इंडिया फिल्म अकॅडमी' प्रथमच ‘माल्टा इंडिया फिल्म फेस्टिव्हल’चं आयोजन करणार आहे. १४ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान माल्टा येथे हा चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे.

माल्टामधील अशाप्रकारचा हा पहिलाच फेस्टिव्हल असून, महोत्सवाच्या शुभारंभाला ज्यांच्या सिनेमात माल्टीज किंवा भारतीय संदर्भ असेल असं जगातील सिनेकर्ते उपस्थित राहणार आहेत. या फेस्टिव्हलला माल्टाच्या पर्यटन मंत्रालयाचं पाठबळ लाभणार असून, या महोत्सवाच्या माध्यमातून दोन देशांतील कला, सांस्कृतिक आणि मनोरंजनाचा दुवा साधण्याचा हा प्रयत्न करण्यात येणार आहे.


विद्या बालन ज्युरी मेंबर

या 'फेस्टिव्हल'साठी विविध प्रकारच्या सिनेमांना प्रवेशाकरता आवाहन करण्यात आलं आहे. ज्युरींनी निवडलेल्या सिनेमांचं प्रदर्शन माल्टाची राजधानी, वॅलेटा येथे सुरू होणाऱ्या तीन दिवसीय स्क्रीनिंगदरम्यान होईल. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन या महोत्सवाची ब्रँड अम्बेसिडर आणि ज्युरी मेंबर आहे.


काय म्हणाली विद्या बालन?

पत्रकार परिषदेत बोलताना विद्या म्हणाली, सिनेकर्त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या सिनेमॅटिक महोत्सवाचा भाग बनणं आनंददायक आणि मानाचं समजते. माल्टा इंडिया फिल्म फेस्टिव्हल फक्त भारतातील प्रतिभावंतांनाच एकत्र येण्याची संधी देत नाही, तर माल्टासारख्या सुंदर आणि जादुई देशातील कलाकारांनाही समाविष्ट करणारा आहे.


माल्टाचे पर्यटन मंत्री म्हणाले...

माल्टाचे पर्यटन मंत्री कॉनराड मिज्झी म्हणाले की, माल्टा आणि भारतात बऱ्याच समान बाबी आहेत. अन्नपदार्थ, फटाके आणि सिनेमे याविषयीचं प्रेम समानच आहे. माल्टा अनेक गाजलेल्या हॉलिवूड सिनेमांचा चित्रीकरणाकरता पार्टनर राहिला आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’सारख्या सिनेमाने माल्टामध्ये भारतीय ब्लॉकबस्टर सिनेमांसाठीचा मार्ग विस्तृत केला आहे. त्यामुळे फेस्टिव्हलला वेगळीच मजा येणार आहे.


विजेत्यांना २,००,००० युरोजचं बक्षीस

माल्टा इंडिया फिल्म फेस्टिव्हल हा माल्टा इंडिया फिल्म अकॅडमीचा उपक्रम आहे, जागतिक सिनेकर्त्यांना आपली प्रतिभा सादर करण्याचा हा अशा प्रकारचा पहिलाच मंच आहे. भारतीय किंवा माल्टीज संदर्भ असलेला कोणताही सिनेमा या फेस्टिव्हलमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरेल. विजेत्यांना एकूण २,००,००० युरोजचं बक्षीस देण्यात येणार आहे. माल्टा, वॅलेटा येथे १४ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान निवडलेले सिनेमे लोकांना पाहता येतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा