Advertisement

ठाण्यातील हेरिटेज वृक्षांवर कुऱ्हाड

ठाणे रिंग मेट्रो, रस्ते रुंदीकरण, मेट्रो स्टेशन आणि ट्विन टनेलसह विविध प्रकल्पांसाठी ८००हून अधिक झाडे तोडण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

ठाण्यातील हेरिटेज वृक्षांवर कुऱ्हाड
SHARES

ठाणे रिंग मेट्रो, रस्ते रुंदीकरण, मेट्रो स्टेशन आणि ट्विन टनेलसह विविध प्रकल्पांसाठी 800 हून अधिक झाडे (trees) तोडण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे यात 50 ते 85 वर्षे वयाची झाडे आणि अनेक हेरिटेज वृक्षांचाही (heritage trees)  समावेश आहे.

रिंग मेट्रो प्रकल्पासाठी रायलादेवी तलाव ते बाळकुमदरम्यान 3212 झाडे बाधित होत आहेत. यापैकी 519 झाडे तोडण्यास, तर 2693 झाडांचे पुनर्रोपण करण्यास वृक्षप्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

यातील नऊ हेरिटेज वृक्षांबाबतचा निर्णय मात्र राखून ठेवला आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या या निर्णयांचा गोषवारा आता महासभेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

ठाणे शहरातील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो (ring metro) उभारण्यात येणार आहे.

या कामासाठी बाधित होणाऱ्या झाडांमध्ये वड, पिंपळ, रेनट्री, आंबा, जांभूळ, कडुनिंब, कदंब, उंबर, फणस यांसारख्या मोठ्या वृक्षांचा समावेश आहे.

या वृक्षांपैकी काहींचे वय 60 ते 75 वर्षांपर्यंत असल्याचे प्रस्तावात नमूद केले. ही झाडे तोडली गेल्यास त्यांची पर्यावरणीय भरपाई केवळ नवीन रोपे लावून होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी, तर 85 वर्षांचा वड, 50 वर्षांचा पिंपळ आणि 55 वर्षांचा वड बाधित होत आहेत. या तीनही झाडांना तोडण्यास मान्यता देण्यात आली आहे.

झाडांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेनेच आपल्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी तीन मोठी झाडे तोडण्यास मंजुरी दिली आहे.

वृक्षतोडीच्या बदल्यात भरपाई वृक्षारोपणासाठी संबंधित प्रकल्पांकडून मोठ्या प्रमाणात सुरक्षा अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.

रिंग मेट्रो प्रकल्पासाठी 37,184 वृक्षांच्या संगोपनासाठी 18 कोटी 59 लाख 20 हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. इतर प्रकल्पांसाठीही कोट्यवधी रुपयांच्या सुरक्षा ठेवीची तरतूद करण्यात आली आहे.

वृक्षप्राधिकरणाने प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी टप्प्याटप्प्याने वृक्षतोड आणि पुनर्रोपणाची परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, हेरिटेज वृक्षांबाबत अंतिम निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. कारण हे वृक्ष 50 ते 80 वर्षे जुने आहेत. त्यामुळे पर्यावरण राखले जाते.

ओवळा-माजिवड्यातील रस्ते रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामात 291 झाडे बाधित होत आहेत. यातील 124 झाडांचे पुनर्रोपण, तर 167 झाडे तोडण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकरणातही नऊ हेरिटेज वृक्ष आढळले आहेत.

तीन हात नाका, आरटीओ, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन आणि माजिवडा परिसरातील मेट्रो स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी 24 झाडे बाधित होत आहेत.

यातील दोन झाडे तोडण्यास आणि 21 झाडांचे पुनर्रोपण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यातील 80 वर्षांच्या पिंपळाच्या हेरिटेज वृक्षाच्या फांद्या छाटण्यास मंजुरी देण्यात आली आहे.



हेही वाचा

फेरीवाल्यांच्या ओळखपत्रासाठी 'इतका' खर्च

नवी मुंबई मेट्रोचा मोठा विस्तार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा