Advertisement

आदिवासी पाऊल पडते पुढे, वारली कलेला व्यवसायाची सांगड

मुंबईतील आरेतल्या पाड्यात राहणारी चित्रकार शीतल बोराडे वारली कला जोपासते. फक्त कला म्हणून नाही तर या कलेला आदिवासी पाड्यातील तरूणीनं व्यवसायाची देखील सांगड घातली. यातून रोजगार निर्मिती देखील तिनं केली.

आदिवासी पाऊल पडते पुढे, वारली कलेला व्यवसायाची सांगड
SHARES

हिरवीगार भातखाचरे, साजरीगोजिरी मंदिरे, गवताचे भारे नि लाकडाच्या मोळ्या डोक्यावरून वाहणारी आदिवासी चिमणपाखरे, पशूपक्ष्यांनी बहरलेली आणि वृक्षवेलींनी सजलेली वनं, वर्तुळाकार चमचमते चंद्र-सूर्य, मातीच्या भिंती आणि गवताने शाकारलेल्या चंद्रमोळ्या, अंगणी केळीची तोरणे, होलिकोत्सवाची धूम, तारपा वाद्याची धून, ग्रामदेवतांच्या प्रसन्न छायेत वावरणारे आणि गाई, म्हशी, शेळ्यांचा सांभाळ करणारे आदिवासी बांधव!

आदिवासींचं चालणं, बोलणं, ऐकणं त्यांचं गाणंच नव्हे तर अगदी जगणंही नैसर्गिक नि निसर्गरम्य शुध्द, स्वच्छ वातावरणाला साजेसं! त्यांचं सगळंच आयुष्य निसर्गाशी एकरूप झालेलं!

आदिवासींच्या दैनंदिन जीवनाचं अंग झालेला हा निसर्ग तांबडा गेरू, तांदळाची भिजवलेली पिठी आणि काडी या चित्रसाधनांच्या माध्यमातून जिवंत करण्याची कला म्हणजे वारली चित्रे! या वारली चित्रांना रुढीपरंपरेच्या जोखडातून मुक्त करून ती अगदी सातासमुद्रपार नेऊन जगाच्या कॅनव्हासवर चितारण्याची कला मुंबईत राहणारी एक आदिवासी तरूणी जोपासत आहे.

मुंबई सारख्या शहरामध्ये देखील वारली चित्रकला जोपासली जाते तसंच वाढवली जात आहे. तुम्ही म्हणाल मुंबईत आदिवासी तरी आहेत का? असाच तुमचा प्रश्न असेल. पण मुंबईसारख्या काँक्रिटच्या या जंगलातही काही आदिवासिंनी निसर्ग टिकवून ठेवण्याचा वसा उचललाल आहे.

मुंबईतील आरेतल्या पाड्यात राहणारी चित्रकार शीतल बोराडे वारली कला जोपासते. आरे कॉलनीत राहणाऱ्या शितलनं आदिवासी संस्कृती आणि निर्सग संवर्धनाचे कार्य आपल्या वारली चित्रकलेतून जगासमोर आणलं आहे. तिची चित्र जागतिक पातळीपर्यंत पोहोचली आहेत.

फक्त कला म्हणून नाही तर या कलेला तिनं व्यवसायाची देखील सांगड घातली. यातून रोजगार निर्मिती देखील तिनं केली.

शीतलनं एमएतून आपलं शिक्षण पूर्ण केलं. पण लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. आदिवासी समाजात राहिल्यानं वारली चित्रकला ही तिच्या रक्तातच भिनलेली. घरातूनच वारली केलेचं बाळकडू मिळालं. लहानपणापासून वारली कलेची आवड असल्यानं तिनं याच क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

आदिवासी लोकांची मातीशी घट्ट नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे आदिवासींचे दैनंदिन व्यवहार, नित्याची कामं तसंच शेतीची कामं, उत्सव, पर्यावरणाशी जोडलेलं नातं यांचं चित्रण वारली चित्रांद्वारे केलं जातं. वारली कला म्हणजे केवळ गोल, त्रिकोण आणि तिरप्या रेषा काढून साकारलेली चित्र नाहीत. तर या कलेच्या माध्यमातून आपण समाजाला काय संदेश देतो हे देखील महत्त्वाचं आहे.

शीतल बोराडे

वारली कलेला शीतलनं फक्त आवड म्हणूनच सिमीत नाही ठेवलं. तर आवडीसोबतच वारली कलेला उपजिविकेचं साधन म्हणून तिनं पाहिलं. यातून स्वत:साठीच नाही तर दुसऱ्यांसाठी देखील तिनं रोजगार निर्मिती केली.

नुकतंच शीतलनं वेगवेगळी वारली चित्र साकारलेली बॅग्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. तिच्या या व्यवसायामुळे रोजगार निर्मिती देखील झाली आहे. पाड्यातीलच दोन मुलींना सोबत घेऊन तिनं हा व्यवसाय सुरू केला आहे.

चित्रकला फक्त भिंतीवर काढली जाते असं नाही. आता वारली चित्रांचा भिंतींपासून सुरू झालेला प्रवास लाकूड, कपडे, बॅग्स आदींपर्यंत येऊन पोहोचला आहे. कारण आता वारली कला जगप्रसिद्ध आहे. शीतल बोराडे यांनी देखील हाच विचार करून बॅग्सद्वारे आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला.

मी विचार केला की, लोकांच्या रोजच्या वापरातील वस्तूंवर जर ही चित्रं काढली तर ती लोकांच्या अधिक पसंतीस उतरतील. यातून आम्हाला दोन पैसे पण मिळतील आणि वारली कला लोकांपर्यंतही पोहोचेल.

शीतल बोराडे

सुरुवातीला शीतल यांनी बाहेरून पिशव्या विकत घेऊन त्यावर वारली कला साकारण्याचा निर्णय घेतला होता. पण पाड्यातील स्त्रियांना रोजगार मिळाला म्हणून त्यांनी हा निर्णय बदलला. पाड्यातीलच दोन तरुणीं निकिता वर्पे आणि त्रिती वर्पे या दोन मुलींना शीतलनं कापडी पिशव्या शिवण्याचं काम दिलं.

निकिता आणि त्रितीनं पिशव्या शिवून दिल्या की शीतलं त्यावर वारली चित्रं साकारते. विशेष म्हणजे कुठल्याही कापडी पिशवीवर तुम्हाला एकसारखी चित्र दिसणार नाहीत. त्यात विविधता तुम्हाला पाहायला मिळेल. १५० रुपयांपासून या बॅगेच्या किंमती सुरू होतात. कमी किंमतीत टिकाऊ आणि इकोफ्रेंडली कापडी पिशव्या उपलब्ध होत असल्यानं मागणीही चांगली आहे.

येत्या काळात या व्यवसायातून पाड्यातील इतर आदिवासींसाठी रोजगार निर्मिती करण्याचा शीतलचा मानस आहे. यासाठी ती काही तरुण तरुणींना प्रशिक्षण देखील देण्याचा विचार करत आहे. जेणेकरून या व्यवसायात अनेक जण जोडले जातील आणि दोन पैसे देखील कमवतील.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा