Advertisement

पावसानं फिरवली पाठ, मुंबईत तीन दिवसात तापमानात 'इतकी' वाढ

शहरामध्ये उकाडा वाढल्याचं भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून सांगितलं.

पावसानं फिरवली पाठ, मुंबईत तीन दिवसात तापमानात 'इतकी' वाढ
SHARES

पावसानं दांडी मारल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईकरांना उकाडा जाणवू लागला आहे. शहरामध्ये उकाडा वाढल्याचं भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून सांगितलं.

मुंबई आणि उपनगर परिसरात पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईचं तापमान ऑगस्टमध्येच वाढताना दिसत आहे. मागील तीन दिवसांमध्ये मुंबईचं तापमानात सात अंशांचा फरक पडल्याचं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

होसाळीकर यांनी ट्विटरवरुन एक आलेख पोस्ट केलाय. यामध्ये त्यांनी मागील तीन दिवसांमध्ये सांताक्रुझ इथल्या हवामानखात्याच्या वेधशाळेत मुंबईतील तापमान वाढल्याची नोंद करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईतील तापमान ३३ अंशांवर पोहचल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील तापमान हे २६ अंशांपर्यंत होतं. मात्र पावसानं विश्रांती घेतल्यानं निरभ्र आकाश दिसून येत आहे. तापमानातही वाढ झाल्याचं होसाळीकर म्हणालेत. मुंबईतील किमान तापमानामध्ये एका अंशांनी वाढ झालीय.

२० ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. ऑगस्टच्या प्रारंभापासूनच मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसानं पाठ फिरवली आहे.

कडक ऊन आणि अधूनमधून येणारी एखादी हलकी सर अशा वातावरणामुळे तापमानही वाढलं आहे. मुंबई उपनगरात काही दिवसांपूर्वी २६.५ अंश सेल्सिअस किमान, तर ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. दोन्हींमध्ये सरासरीच्या तुलनेत २ अंशांची वाढ दिसून आली.

जून आणि जुलै या सलग दोन महिन्यांत सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. ऑगस्टचे पहिले २० दिवस कोरडे गेले असतानाच पाऊस पुन्हा परतण्याची आशा निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.



हेही वाचा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता

बीकेसीत मियावाकी पद्धतीने वनीकरणाला सुरूवात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा