लोकांच्या मनात सागरी जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, बॉम्बे (mumbai) नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) आणि महाराष्ट्र वन विभाग-कांदळवन चेंबुर यांनी संयुक्तपणे सागरी सस्तन प्राणी आणि पक्ष्यांच्या रेकॉर्डिंग आणि अभ्यासासाठी 'जलचर' नावाचे मोबाइल ॲप विकसित केले आहे. या अंमलबजावणीतून सागरी जलचरांचे संवर्धन होण्यासही मदत होणार आहे.
जलचर ॲप मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये वापरले जाऊ शकते. हे ॲप सागरी जीव (marine animals), प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींची माहितीची नोंद ठेवते. स्थानिक मच्छिमार, संशोधक, तटरक्षक, नौदल कर्मचारी या ॲपवर सागरी जीव, प्राणी आणि पक्षी यांची माहिती देऊ शकतात.
तसेच रेकॉर्ड केलेल्या जीवांची माहिती त्यांना मिळू शकते. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सागरी अधिवासात आढळणाऱ्या सागरी जीवांची संपूर्ण माहिती संकलित करणे आणि त्याद्वारे सागरी जीवांचे संवर्धन करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
दरम्यान, जीपीएस प्रणालीचा वापर करून प्राणी-पक्ष्यांचे फोटोही अपलोड करता येणार आहेत. एखादा सागरी जीव किनाऱ्यावर आल्यास (अडकून) वनविभागाला या यंत्रणेद्वारे पूर्वसूचना मिळू शकते. मोसमी पाणपक्ष्यांवर अधिक तपशीलवार नोंदी गोळा केल्या जाऊ शकतात. त्यामुळे जलचरांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना आखणे शक्य होणार आहे.
तसेच, तातडीची मदत हवी असल्यास नोंदणी करण्याची तरतूद या प्रणालीमध्ये आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ कारवाई करण्यास संबंधित यंत्रणांना मदत होईल. बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे म्हणाले की, मच्छिमारांना या प्रणालीमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेतले जाईल.
जलचर ॲप हे महाराष्ट्रातील समृद्ध सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धनामध्ये स्थानिक सहभाग वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येते.
हेही वाचा