Advertisement

मुंबईच्या किनारपट्टीचा प्रारूप आराखडा सादर


मुंबईच्या किनारपट्टीचा प्रारूप आराखडा सादर
SHARES

मुंबई - महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (महाराष्ट्र सागर तटीय क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण) कडून नुकताच मुंबई किनारा क्षेत्र व्यवस्थापनाचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील मिठागरांचा सीआरझेडमध्ये समावेश करण्यात आल्याने आता मिठागरे सुरक्षित होणार आहेत. तर माहिम बे आणि बॅकबे किनाऱ्यालगत 500 मीटरच्या आत कोणताही विकास करण्यास परवानगी नव्हती. आता मात्र ही अट शिथील करत 100 मीटरपर्यंत आणण्यात आली आहे. त्याचबरोबर मढ, अक्सा, मार्वे या किनारपट्ट्यांचा परिसर सीआरझेड-3 मधून सीआरझेड-2 मध्ये आणण्यात आला आहे. 

दरम्यान, या आराखड्यावर मुंबईकरांच्या सूचना-हरकती मागवण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी देण्यात आल्याची माहिती अप्पर मुख्य सचिव पर्यावरण तथा अध्यक्ष, एमसीझेडएमए सतीश गवई यांनी दिली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावतरणीय बदल मंत्रालयाकडून 2011 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सीआरझेड अधिसूचनेतील तरतुदींनुसार राज्यातील तटीय (किनारा) जिल्ह्यांकरता नवीन सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा बनवणे अपेक्षित होते. त्यानुसार या आराखड्याची सात वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. एमसीझेडएमएने मुंबई शहर-उपनगर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार करत आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यात अनेक चांगल्या तरतुदी असल्या तरी विकासासाठी अनेक किनारे खुले करण्यात आल्याने बिल्डर लॉबीचे यामुळे चांगभले होणार असल्याचे म्हणत पर्यावरण तज्ज्ञांनी अशा तरतुदींबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

नव्या प्रारूप आराखड्यानुसार मिठागरे याआधी सीआरझेडमध्ये मोडत नव्हते. पण आता मिठागरांचा समावेश सीआरझेड-1 मध्ये करण्यात आला आहे. या तरतुदीचे सर्वच तज्ज्ञांनी, पर्यावरण संघटनांनी जोरदार स्वागत केले आहे.

मिठागरांच्या जागेवर वर्षानुवर्षे बिल्डरांचा डोळा असून, ही जागा घरबांधणीसाठी खुली करण्याची मागणी बिल्डर लॉबीकडून करण्यात येत आहे. आता मात्र मिठागरे सीआरझेड-1 मध्ये समाविष्ट करण्यात आल्याने मिठागरे सुरक्षित असणार असून, येथे कोणतेही बांधकाम करता येणार नाही 

- देबी गोएंका, पर्यावरण तज्ज्ञ

तर माहिम बे, बॅकबे (गिरगाव ) किनारपट्टीच्या 500 मीटरच्या आत कोणत्याही प्रकारचा विकास करण्यास बंदी होती. आता मात्र ही अट शिथील करत 500 ऐवजी 100 मीटरपर्यंत आणली आहे. त्यामुळे आता बिल्डरांचे फावणार असल्याचे म्हणत गोयंका यांनी या तरतुदींवर आक्षेप घेतला आहे. तर हा आराखडा बराच मोठा असल्याने या आराखड्याचा बारीक अभ्यास करत आम्ही आमचे आक्षेप लवकरच नोंदवू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आक्सा, मढ, मार्वे आणि एरंगल या किनारपट्ट्या सीआरझेड-3 मधून सीआरझेड-2 मध्ये आणण्यात आल्याची माहिती वॉचडॉग फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली आहे.

या किनारपट्ट्या सीआरझेड-3 मध्ये असल्याने तिथे हवा तसा विकास बिल्डरांना करता येत नव्हता. त्यामुळे आतापर्यंत या किनारपट्ट्या आणि तेथील गावकरी सुरक्षित होते. आता मात्र हा परिसर सीआरझेड-2 मध्ये आणण्यात आल्याने बिल्डरांना मोकळे रान मिळणार आहे. भविष्यात येथे मोठ्या प्रमणात विकास होईल आणि वाढत्या लोकसंख्येचा भार पडेल 

अॅड. गॉडफ्रे पिमेंटा, वॉचडॉग फाऊंडेशन

राजभवन, हाजीअली, कार्टर रोडसारखे काही परिसरही प्रारूप आराखड्यात सुरक्षित करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे बीकेसीचा मिठीलगतचा परिसर सीआरझेडमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

दरम्यान, माहिम बे-बॅकबेसाठीची 500 मीटरची अट शिथील केल्याने मुंबई पुराखाली जाण्याची भिती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, ही तरतूद मागे घेण्याची मागणी केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा