Advertisement

ओखी इफेक्ट: म्हावरं महागणार... पुढचे १० दिवस मासेमारी बंद


ओखी इफेक्ट: म्हावरं महागणार... पुढचे १० दिवस मासेमारी बंद
SHARES

ओखी वादळामुळे गेल्या ३ दिवसांपासून कोकण, मुंबई समुद्र किनारपट्टीलगतची मासेमारी पूर्णत: बंद आहे. पुढील आणखी १० दिवस मासेमारी बंद राहणार असल्याने माशांची टंचाई निर्माण होऊन मासे महागण्याची शक्यता, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी व्यक्त केली आहे.


१५ कोटींचं नुकसान

ओखी वादळाच्या संकटाची चाहूल लागल्याबरोबर राज्य सरकारने हाय अलर्ट जारी करत मच्छिमारी बंद ठेवण्याचं जाहीर केलं. तेव्हापासून मुंबईतील मासेमारी बंद असून बोटी किनाऱ्यावर लागल्या आहेत. मुंबईत दररोज अंदाजे ५ कोटी रुपये किंमतीचे मासे बाजारात विक्रीसाठी आणले जातात. यातील १ कोटी किंमतीच्या माशांची विक्री मुंबईतील बाजारात केली जाते. तर उरलेल्या ४ कोटी रुपयांचे मासे निर्यात केले जातात. असं असताना गेल्या ३ दिवसांपासून मासेमारी बंद असल्याने मच्छिमारांचं किमान १५ कोटी रुपयांचं नुकसान झालं असून पुढचे १० दिवस मासेमारी बंद राहिल्यास आणखी ५० कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतंसुकी मासळीही खराब

एवढंच नाही, तर अवेळी पावसामुळे मच्छिमारांनी किनाऱ्यावर सुकण्यासाठी ठेवलेल्या मासळीचंही मोठं नुकसान झालं आहे. ताज्या मासळीची बाजारात टंचाई निर्माण झाल्यावर खवय्ये सुक्या मासळीचा पर्याय शोधतात. परंतु पावसाने सुकी मासळीही खराब केल्याने खवय्यांची पंचाईत होणार आहे.


नुकसान भरपाई मिळावी

सध्या बहुतांश मच्छिमार जाळ्या आणि इतर साहित्य सोडून जीव वाचवून किनाऱ्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्याप्रमाणे मच्छिमारांनाही नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मच्छिमारांनी राज्य सरकारला केल्याची माहिती तांडेल यांनी दिली आहे. नुकसान भरपाईसाठी शक्य तितक्या लवकर जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनामे सुरू करत योग्य ती नुकसान भरपाई मिळावी हीच मच्छिमारांची मागणी, असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सलग १० ते १५ दिवस सलग मासेमारी बंद राहणार असल्याने माशांची मोठी टंचाई होणार असून मच्छिमारांचं आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे दुहेरी नुकसान भरून काढण्यासाठी मच्छिमारांकडून माशांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या मुंबईकरांना माशांवर ताव मारायचा असेल, त्यांनी खिशाला खार लावून घेण्याची तयारी ठेवावी.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा