राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतही दररोज ढगाळ वातावरण असून पावासाची शक्यता अधिक असते. अशातच हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत येत्या काही दिवसात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळं महापालिका प्रशासनानं पावसाळीपूर्व कामांना गती दिली असून, मुंबई आणि उपनगरात पावसाळ्यात पाणी साठल्याने होणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीचे पूर्वानुमान देणारी ‘आयफ्लोज-मुंबई’ (iFLOWS-Mumbai) ही एकात्मिक प्रणाली तयार झाली आहे.
शुक्रवारी भारतीय हवामान विभागाकडून ही प्रणाली महापालिकेला हस्तांतर केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची प्रणाली असणारं मुंबई हे देशातील दुसरं शहर ठरेल. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे संयुक्तपणे वेब माध्यमातून शुक्रवारी ही प्रणाली कार्यरत करणार आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात जास्तीचा पाऊस पडल्यास मुंबईतील सखल भागात पाणी साचतं. गेल्या काही वर्षांपासून वाढत्या बांधकामांमुळं निर्माण झालेल्या अडथळ्यानं अनेक ठिकाणी पाणी साचतं. मात्र, यावर्षी पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचं पूर्वाननुमान देणारी प्रणाली तयार झाल्यामुळं या समस्येवर तोडगा काढणं शक्य होणार असून, मुंबईकरांना प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
हवामानाच्या नोंदी, नद्यांची पातळी, भरती-ओहोटी, भूभागाच्या नोंदी आणि पावसाचे पूर्वानुमान या आधारे पुराची पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित करण्यास गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरुवात झाली. यापूर्वी चेन्नई शहरासाठी अशा प्रकारची प्रणाली आयआयटी मुंबई आणि हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांच्या चमूनं विकसित केली होती. त्याच धर्तीवर मुंबईसाठीदेखील ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्ट, इंडियन इन्सिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटरोलॉजी, नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च आणि मुंबई महापालिकेच्या आत्पकालिन यंत्रणा यांच्या सहकार्यातून विकसित करण्यात आली आहे.
या नव्या प्रणालीच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षांपासून सर्व नागरीकांनादेखील याचा वापर करता येणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पूरपरिस्थितीचं पूर्वानुमान देण्यासाठी स्थानिक पातळीवरील विविध नोंदी गरज भासते. मुंबईतील नद्या, भौगोलिक परिस्थिती, तलाव, पाणी साचणारी ठिकाणे, भरती ओहोटी या नोंदीचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. पडलेल्या पावसाच्या नोंदी आणि पूर्वानुमान यांचा मेळ या इतर नोंदीशी घालून सहा ते ७२ तासांतील संभाव्य पूरपरिस्थितीचे पूर्वानुमान देता येईल असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये ‘जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम मॅपिंग’ प्रणालीचा वापर करण्याच आला आहे.
हेही वाचा -
वाहतूककोडींवर पर्याय; मुंबई पोलिसांची ‘सॅगवे’ने गस्त
आज मध्यरात्रीपासून मालाडच्या मढ भागात टोटल लॉकडाऊन