Advertisement

प्रदूषणाच्या पातळीत वाढ; मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी


प्रदूषणाच्या पातळीत वाढ; मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी
SHARES

मुंबईसह राज्यभरातील तापमानात मागील अनेक दिवसांपासून सतत बदल होत आहेत. मुंबईत सोमवारपासून कोरडं वातावरण आणि तापमानातही वाढ झाली आहे. परंतु, मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळीही वाढली आहे. त्यामुळं मुंबईत 'हेल्थ अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी धोकादायक स्तरावर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्याचे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्यानं भौतिकशास्त्रज्ञ तसंच, हवामान तज्ज्ञ प्राध्यापक किरणकुमार जोहरी यांनी मुंबईत 'हेल्थ अलर्ट' जारी केला आहे. मुंबईतील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. सध्या मुंबईतील तापमान ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. त्यासोबतच हवेची गुणवत्ताही खालावली आहे.

हवेचा गुणवत्ती निर्देशांक १७० इतका नोंदवला गेला आहे. मुंबईत प्रदूषण वाढल्याने ‘हेल्थ अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दमा, अस्थमा, हृदयविकार, मधुमेह इत्यादी आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे वातावरण घातक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे हवेचा वेग मंदावला आहे. त्यामुळे धुलिकरण जमिनीलगत साचून राहिल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे.

या आठवड्यात कोकण-गोवा पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वातावरण पूर्णपणे स्वच्छ असेल. गेल्या आठवड्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्येही दिवसा आणि रात्रीदेखील तापमान ४ ते ८ अंश सेल्सिअसने वाढलं होतं. या भागांध्ये दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व दिशेने वारे वाहत होते. या वाऱ्यामध्ये आद्रतेची कमी होती. त्यामुळे तापमान वाढलं.

आता हवामानाचं रुप बदललं आहे. हवेचं देखील रुप बदलत आहे. उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातील वारे मैदानी क्षेत्रांतून महाराष्ट्रात येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरुवातीला राज्यातील उत्तरेकडील शहरांमध्ये थंडी वाढेल. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात तापमान कमी होईल आणि थंडी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १२, १३ आणि १४ जानेवारीला तापमान सामान्य होईल. तर काही भागांध्ये पारा खाली घसरण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा