पावसाचा कहर सुरूच, बोरीवली-विरार रेल्वे सेवा ठप्प


SHARE

हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनुसार मंगळवारी देखील पावसाने आपला जोर कायम राखला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वसामान्यांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने या तिन्ही मार्गांवरील वाहतूक अर्धा ते एक तास उशीराने सुरू आहे. तर बोरीवली-विरार दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. बऱ्याच ठिकाणी शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांनीही आपली सेवा बंद ठेवली आहे.


वसई-विरार, नालासोपाऱ्याला झोडपलं

वसई-विरारसहित नालासोपारा परिसराला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. परिणामी येथील रहिवांशाची रस्ते आणि रेल्वे मार्गाचा संपर्क तुटला आहे. वसई-विरार आणि नालासोपारा स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी जमा झाल्यामुळे विरार-चर्चगेट अप आणि डाऊन लोकल पूर्णपणे बंद झाल्या आहेत. परिणामी सकाळी चर्चगेटच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांचा पुन्हा खोळंबा झाला आहे.


इथे पडतोय पाऊस?

नालासोपारा बस स्टँड सोबतच स्टेशन परिसरात दुकांनात आणि घरांमध्ये पाणी शिरून वस्तूंचं नुकसान झालं आहे. मुंबई शहर, मध्य, पूर्व उपनगरांतही मुसळधार पावसाचा दणका सुरूच आहे. बोरीवली, कांदिवली, गोरेगाव, अंधेरीत पाऊस चांगलाच पडतोय. तर दादर, माटुंगा परळ ते चर्चगेट परिसरातही पावसाने जराही उसंत घेतलेली नाहीय.

ठाण्याच्या जोडीलाच डोंबिवली-कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, परिसरातही पावसाने सर्वसामान्यांना बेहाल केलं आहे. पूरपरिस्थितीकडे पाहता अनेक ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर पालकांनीही आपल्या मुलांना घरातच ठेवलं आहे.हेही वाचा-

पावसाचं लाइव्ह अपडेट बघण्यासाठी इथं क्लिक करासंबंधित विषय
ताज्या बातम्या