Advertisement

बोरीवलीचं संजय गांधी पार्क खुलं करा, माॅर्निंग वाॅकर्सची मागणी

सरकारने लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिलेली असल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुन्हा सुरू करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

बोरीवलीचं संजय गांधी पार्क खुलं करा, माॅर्निंग वाॅकर्सची मागणी
SHARES

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) म्हणजे मुंबई उपनगराचं फुफ्फुस. या उद्यानात सकाळच्या सुमारास माॅर्निंग वाॅक, व्यायाम करायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु लाॅकडाऊनमुळे मागील ३ महिन्यांपासून हे उद्यान सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलं आहे. परंतु राज्य सरकारने लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिलेली असल्याने उद्यान पुन्हा सुरू करण्याची (Morning Walkers Demand the Opening of Sanjay Gandhi National Park) मागणी स्थानिकांकडून होत आहे.

राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आरोग्य सुधारण्यासाठी पहाटे ५ वाजेपासून संध्याकाळी ७ पर्यंत मैदानं किंवा इतर ठिकाणी फिरायला जाण्यास, व्यायाम करायला (साहित्य वगळून, सोशल डिस्टन्सिंग ठेवून) परवानगी दिलेली आहे. परंतु तरी देखील सकाळी माॅर्निंग वाॅक करण्याकरीता येणाऱ्यांसाठी संजय गांधी उद्यान बंद ठेवण्यात आल्याने स्थानिक काहीसे नाराज आहेत. तर दुसऱ्या बाजूला उद्यान इतक्यास सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचं मत काहीजण नोंदवत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्यावर २६ मार्च रोजी उद्यान बंद करण्यात आलं होतं.

हेही वाचा - दहिसर, बोरीवली, कांदिवलीतील रुग्णवाढ चिंताजनक

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सरासरी दिवसाला ६ हजार जण भेट देतात. त्यातील बहुतेजण हे ग्रुपने म्हणजेच घोळक्याने उद्यानात येतात. अशा स्थितीत सोशल डिस्टन्सिंग राखणं अवघड असेल. त्यामुळे सध्या तरी उद्यान सुरू करण्याची आवश्यकता नाही, असं मत उद्यानात निसर्ग सफारीचं आयोजन करणारे शार्दुल बिजीकर नोंदवतात.

तर, उद्यान सुरू करायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे वन विभागाच्या वन्यजीव विभागावर अवलंबून असेल. उद्यान सुरू केल्यावर होणाऱ्या गर्दीला आळा घालणं प्रशासनासाठी सोपं काम नसेल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन योग्यरित्या न झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन अनेकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकेल, असं स्थानिक वन अधिकाऱ्याने सांगितलं.

दरम्यान, दहिसर, बोरीवली, कांदिवलीमध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढीचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पालिकेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईमधील कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा काळ सरासरी २८ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण वाढीचा दर २.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. दहिसर, बोरीवली, कांदिवलीमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा काळ कमी सर्वाधिक आहे.  कांदिवली आणि बोरीवलीमधील रुग्ण दुपटीचा काळ प्रत्येकी १७ दिवस आहे. तर दहिसरमधील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १३ दिवस आहे.

हेही वाचा- तर राज्यात पुन्हा लाॅकडाऊन करावं लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

संबंधित विषय
Advertisement