Advertisement

राज्यातील १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव (एकूण क्षेत्र २६९ चौ कि.मी.) अभयारण्य घोषित करण्यासह राज्यातील १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा निर्णय राज्य वन्य जीव मंडळाच्या १६ व्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता
SHARES

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव (एकूण क्षेत्र २६९  चौ कि.मी.) अभयारण्य घोषित करण्यासह राज्यातील १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा निर्णय राज्य वन्य जीव मंडळाच्या १६ व्या बैठकीत घेण्यात आला. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषित  झाल्यानंतर त्याचा झोनल मास्टर प्लॅन जिल्हाधिकाऱ्यांनी ३ महिन्यात तयार करावा. त्यासाठी वन, पर्यावरण, महसूल, नगरविकास अशा संबंधित विभागाचं सहकार्य  घ्यावं असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी यावेळी दिले.

राज्यात घोषित  करण्यात आलेली नवीन १० संवर्धन राखीव क्षेत्र पुढीप्रमाणे आहेत.आंबोली दोडामार्ग संवर्धन राखीव- सिंधुदुर्ग,चंदगड संवर्धन राखीव- कोल्हापूर,आजरा- भुदरगड संवर्धन राखीव- कोल्हापूर,गगनबावडा संवर्धन राखीव- कोल्हापूर, पन्हाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर,विशाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर,जोर जांभळी संवर्धन राखीव-सातारा,  क्लस्टर संवर्धन राखीव- सातारा अशा पश्चिम घाटातील ८ संवर्धन राखीव  क्षेत्रांना मान्यता देण्यात आल्यामुळे वन्यजीवांचा भ्रमणमार्ग मोठ्या प्रमाणात संरक्षित झाला आहे. या ८ तसंच विदर्भातील महेंद्री व मुनिया या क्षेत्रासही संवर्धन राखीवचा दर्जा देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचं वनवैभव चांदा ते बांद्यापर्यंत आहे. त्याचे विविध ऋतूतील वैशिष्ट्य टिपण्यास वनरक्षकांना सांगावं, त्याचा दर्जा उत्तम राखावा, यावरून राज्यासाठी आपण एक चांगली फिल्म तयार करू. 

हेही वाचा- राज्यात थंडी वाढली; तापमान ८.८ अंशांपर्यंत घसरलं

राज्यात आधीचे ६ आणि नवीन घोषित तिलारी अशी मिळून ७ संवर्धन राखीव आहेत. त्या क्षेत्रात महत्त्वाची कामे करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी द्यावा या वन विभागाच्या (forest department) मागणीवर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

वाघाप्रमाणे बिबट्या आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करा तसंच महेंद्रीला संवर्धन राखीव घोषित करताना भविष्यात त्याचं अभयारण्यात रूपांतर करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

जंगलावर लोकांचं अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना रोजगार  निर्माण करून देण्यासाठी वन विभाग करत असलेल्या प्रयत्नासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. असेच प्रयत्न केल्यास वन किंवा अभयारण्याबद्दल  लोक अधिक सकारात्मक होऊन  संवर्धनात सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात एकाच वेळी १ अभयारण्य व १० संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र (maharashtra) हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.आणखी सुमारे १ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र हे संवर्धन राखीव झालं आहे व कन्हाळगाव हे राज्यातील ५० वे अभयारण्य झालं आहे, असं वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं.

तर, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी, लोणार सरोवराला नुकतंच रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्याच्या संवर्धन व संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय  स्तरावरून प्राप्त होणाऱ्या निधीसाठी प्रस्ताव सादर करावा, असं सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा