Advertisement

बाबूजींचा सांगितीक प्रवास उलगडणार ‘आनंदयात्री’

आठवणींच्या शब्द-सूरांवर विराजमान झालेला ‘आनंदयात्री’ हा कार्यक्रम नुकताच रविंद्र नाटय मंदिरात पार पडला.

बाबूजींचा सांगितीक प्रवास उलगडणार ‘आनंदयात्री’
SHARES

एखादी व्यक्ती गेली तरी आठवणींच्या रूपात ती जशी मागे राहते, तसाच कलाकार गेला तरी कला, गायक गेला तरी गाणं आणि संगीतकार गेला तरी संगीत मागे राहतंच… संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी जरी आज आपल्यात नसले, तरी त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही त्यांची आठवण करून देतात. अशाच आठवणींच्या शब्द-सूरांवर विराजमान झालेला ‘आनंदयात्री’ हा कार्यक्रम नुकताच रविंद्र नाटय मंदिरात पार पडला.


बाबूजींना स्वरांजली

संगीत आणि कला क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगलेला ‘आनंदयात्री’ बाबूजींच्या शब्द-सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा ठरला. कलेच्या माध्यमातून रसिकांचं जीवन आनंदमयी करणाऱ्या दिग्गजांच्या कारकिर्दीचा वेध या कार्यक्रमात घेण्यात येणार आहे. ‘आनंदयात्री’च्या पर्वाची सुरुवातच शब्द-सुरांचे जादूगार असलेल्या बाबूजींच्या अजरामर गीतांनी… बाबूजींचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं स्टार प्रवाह वाहिनीच्या वतीनं त्यांना ही अनोखी स्वरांजली वाहण्यात आली.




कारकिर्दीला उजाळा

अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी बाबूंजींची गाणी नेमकी कशी जन्माला आली? या गाण्यांच्या निर्मिती मागे काय प्रेरणा होती? याचा उलगडा ‘आनंदयात्री’ या कार्यक्रमात करण्यात आला. सुधीर फडके यांचे पुत्र आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या खास उपस्थितीत बाबूजींच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला. बाबूजींची गाणी आजही मनामनात घर करुन आहेत. ‘आनंदयात्री’च्या निमित्ताने या गाण्यांचे सूर पुन्हा एकदा घुमले.




सांगीतिक मैफील

श्रीधर फडके, सुरेश वाडकर, अशोक पत्की, रवींद्र साठे, सावनी रविंद्र, प्रियांका बर्वे आणि हृषिकेश रानडे यांनी बाबूजींची अजरामर गीतं सादर करत मैफीलीत रंग भरले. या सांगीतिक मैफीलीचं सूत्रसंचालन गिरीजा ओक गोडबोलेनं केलं. ‘आनंदयात्री’ हा फक्त एक कार्यक्रम नसून, एक परंपरा असल्याचं मत स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केलं. हीच परंपरा अखंड जोपासत स्टार प्रवाह महाराष्ट्रातल्या दिग्गज कलाकारांना मानवंदना देणार असल्याचंही सतीश म्हणाले. शब्द-सुरांची ही अनोखी मैफील प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि घरात जागा बनवेल अशी आशाही सतीश यांनी व्यक्त केली.




सोहळ्याला मान्यवरांची हजेरी

‘आनंदयात्री’च्या निमित्ताने रंगलेल्या या आनंदमयी सोहळ्याला अजिंक्य देव, अलका कुबल, समीर आठल्ये, निशिगंधा वाड, दिपक देऊळकर, किशोरी शहाणे-विज, आदेश-सुचित्रा बांदेकर, सचिन खेडेकर, स्वप्निल जोशी, सुमीत-चिन्मयी राघवन, अवधूत गुप्ते, पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे, देवकी पंडित, विद्याधर जोशी, संगीतकार अजित परब यांच्यासह अनेक मराठी टिव्ही आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी हजेरी लावली. १० मार्चला सायंकाळी ७ वाजता ही अनोखी मैफल स्टार प्रवाहवर प्रसारीत करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

बेस्टने संपाचा पगार कापल्यानं कर्मचाऱ्यांसह सदस्यही नाराज

पालिका शाळांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा