Advertisement

मोलकरीण बाई'ला लाभलं पत्कींचं संगीत

सोनी मराठी वाहिनीवरील 'एक होती राजकन्या' या मालिकेच्या शीर्षक गीतापाठोपाठ अशोक पत्की यांनी स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'मोलकरीण बाई' या मालिकेचं शीर्षक गीतही संगीतबद्ध केलं आहे.

मोलकरीण बाई'ला लाभलं पत्कींचं संगीत
SHARES

कायम संगीतामध्ये मेलोडी शोधणाऱ्या आणि तितक्याच आत्मीयतेनं ती रसिकांसमोर सादर करणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी आजवर अनेक मालिकांची शीर्षकगीतं अजरामर केली आहेत. आता 'मोलकरीण बाई' या मालिकेच्या शीर्षकगीताला पत्कींच्या मेलोडीयस संगीताचा स्पर्श लाभला आहे.


उर्मिला धनगरच्या ठसकेबाज आवाजात

सोनी मराठी वाहिनीवरील 'एक होती राजकन्या' या मालिकेच्या शीर्षक गीतापाठोपाठ अशोक पत्की यांनी स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'मोलकरीण बाई' या मालिकेचं शीर्षक गीतही संगीतबद्ध केलं आहे. २५ मार्चपासून सुरू होणाऱ्या या मालिकेचं शीर्षक गीत रोहिणी निनावे यांनी लिहिलं आहे. मालिकेच्या कथानकाला साजेसे शब्द रोहिणी यांनी गीतामध्ये गुंफले आहेत. उर्मिला धनगरच्या ठसकेबाज आवाजात पत्कींनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे.


ममता आणि गावरान ठसका

'मोलकरीण बाई'च्या शीर्षक गीताविषयी पत्की म्हणाले की, कोणत्याही गीतामध्ये मेलोडी असणं गरजेचं असतं. मेलोडी नसेल तर त्या गाण्यात गोडवा वाटत नाही. मालिकेचं शीर्षकगीत करताना त्यातील कथानकाचा भावही लक्षात घ्यावा लागतो. या मालिकेचं गीतही प्रत्येकाला आपलंसं वाटेल असं आहे. 'दिस रात पदरात, जरी कष्टाचं आंदण... दाराशी बांधलं तिनं, स्वप्नांचं तोरण...' हे शब्दच खूप बोलके आणि उत्साहवर्धक आहेत. ममता आणि गावरान ठसका यांचा उत्तम मिलाफ या शीर्षक गीताचं वेगळेपण म्हणता येईल.


कष्ट करणाऱ्या स्त्रियांविषयी

रोहिणी निनावेंनी हे शीर्षकगीत लिहिलं आहे. मालिकेची कथा आणि पात्रांचं मनोगत शीर्षक गीतातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी सांगितलं. कष्ट करणाऱ्या स्त्रियांविषयीची ही मालिका आहे. दु:खातही सुख शोधण्याची त्यांची सकारात्मक वृत्ती 'मोलकरीण बाई' या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. प्रेक्षकांना हे शीर्षकगीत आणि मालिका नक्की आवडेल अशी भावना रोहिणी निनावे यांनी व्यक्त केली आहे.


एक अविभाज्य भाग

उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम या कलाकारांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. जिच्या असण्यानं आयुष्य जितकं सुखकर होतं, तितकंच तिच्या नसण्यानं अस्ताव्यस्त बनतं. कुटुंबातली सदस्य नसली तरी ती कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग असते. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट 'मोलकरीण बाई' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. यासोबतच घरकाम करणाऱ्या स्त्रियांचं भावविश्व मालिकेच्या शीर्षकगीतातून पत्की यांनी रेखाटलं आहे.



हेही वाचा -

आपण यांना ओळखलंत का?

परीक्षा संपली आणि 'ती' परतली...



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा