जॉनीसोबत भरत-निर्मिती करणार 'एक टप्पा आऊट'

टेलिव्हीजनवरील कॅामेडी शो नेहमीच रसिकांचं लक्ष वेधून घेत मनोरंजन करत असतात. 'एक टप्पा आऊट' हा एक नवा विनोदी शोदेखील आता प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.

SHARE

टेलिव्हीजनवरील कॅामेडी शो नेहमीच रसिकांचं लक्ष वेधून घेत मनोरंजन करत असतात. 'एक टप्पा आऊट' हा एक नवा विनोदी शोदेखील आता प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.


विनोदवीरांचा शोध

ऑफिसच्या वेळा, मुलांचं शिक्षण, महिन्याचं बजेट, भविष्याची तरतूद टेन्शनची कारणं एक ना अनेक. धकाधकीच्या जीवनात खळाळतं हास्य कुठेतरी हरवत चाललं आहे. याच समस्येवर हास्याचं औषध घेऊन येत आहे स्टार प्रवाहचा नवा कॉमेडी शो 'एक टप्पा आऊट'. कार्यक्रमाचं नाव जितकं हटके आहे तितकीच हटके असेल या शोची संकल्पना. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या विनोदवीरांना आपले कलागुण टेलिव्हीजनच्या माध्यमातून जगासमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे.


३६ स्पर्धकांची निवड

महाराष्ट्रात दडलेल्या विनोदवीररूपी हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करणार आहेत कॉमेडीचा बादशाहा जॉनी लीवर आणि मराठीतले दोन दिग्गज कलाकार अर्थातच निर्मिती सावंत आणि भरत जाधव. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी येथे पार पडलेल्या ऑडिशन्समधून या शोसाठी तब्बल ३६ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धकांमधून १६ स्पर्धकांमध्ये कॉमेडीची लढत रंगणार आहे. या शोच्या निमित्तानं जॅानी लिव्हर मराठी शोमध्ये प्रथमच परीक्षण करताना दिसणार आहे. याशिवाय निर्मिती आणि भरत यांच्या विनोदाची किनारही हा शो आणखी रंगतदार बनवण्यास कारणीभूत ठरेल.


 नव्या टॅलेण्टसाठी व्यासपीठ 

या कार्यक्रमाविषयी जॉनी म्हणाला की, ह्युमर आहे म्हणूनच त्या जागी जज म्हणून जॉनी लीवर आहे. स्टार प्रवाह वाहिनीनं 'एक टप्पा आऊट'च्या निमित्तानं नव्या टॅलेण्टसाठी खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं आहे. या अनोख्या संधीचा लाभ सर्वांनीच घ्यायला हवा. 'एक टप्पा आऊट'मध्ये माझा सहभाग आहे याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान असल्याचंही जॅानी म्हणाला. निर्मिती आणि भरतदेखील या शोसाठी खूपच उत्सुक आहेत. स्पर्धकांचा उत्साह आणि टॅलेण्ट खरोखर थक्क करणारं आहे. या मुलांकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. खळखळून हसण्याचं निमित्त 'एक टप्पा आऊट' प्रेक्षकांना देईल याची खात्री असल्याची भावना निर्मिती आणि भरत यांनी व्यक्त केली आहे.


५ जुलैपासून सुरू

५ जुलैपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाविषयी स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, सध्या जगाला हसण्याची आणि हसवण्याची गरज आहे. यासाठीच स्टार प्रवाह वाहिनी 'एक टप्पा आऊट' हा काहीसा वेगळा कॅान्सेप्ट असलेला अनोखा स्टॅण्ड अप कॉमेडी शो घेऊन येत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या टॅलेण्टचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाईल. दिग्गज परीक्षक आणि सुप्रसिद्ध कलाकार मंडळींच्या सानिध्यात नवख्या कलाकारांना मार्गदर्शन केलं जाईल.
संबंधित विषय
ताज्या बातम्या