Advertisement

बोलक्या बाहुल्यांची धमाल, मराठी मालिका 'घरात बसले सारे'

लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाचे काही क्षण देण्यासाठी हे कार्यक्रम सज्ज झाले आहेत.

बोलक्या बाहुल्यांची धमाल, मराठी मालिका 'घरात बसले सारे'
SHARES

लॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मालिकांचे जुने भाग, जुन्या काही मालिकांचं पुनःप्रक्षेपण आणि पूर्वीचे पुरस्कार सोहळे यांचं प्रक्षेपण सध्या वाहिन्यांवर होत आहे. पण आता प्रतीक्षा संपली कारण झी मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे मर्यादित भागांच्या नवीन मालिका आणि रिऍलिटी शोज. लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाचे काही क्षण देण्यासाठी हे कार्यक्रम सज्ज झाले आहेत.

रामदास पाध्ये म्हटलं की आपल्याला आठवतात ते बोलके बाहुले अर्धवट राव, आवडा अक्का आणि त्यांच्या गमती जमती, आता हेच ‘अर्धवट राव आणि आवडा अक्का, त्यांचा मुलगा चंदन, सून सुनयना आणि नातू छोटू सिंग सोबत घेऊन येत आहेत एक नवा कोरा कार्यक्रम ‘घरात बसले सारे’.

रामदास पाध्ये म्हणाले की, मी देश विदेशात या बाहुल्यांचे अनेक प्रयोग केले, पण डेलीसोप मध्ये असा प्रयोग कधीच केला नव्हता. पण आता मी माझ्या बोलक्या मित्रांसोबत एक वेगळा प्रयोग करणार आहे. या लॉकडाऊनमध्ये हा कार्यक्रम साकारताना माझ्या फॅमिलीची म्हणजेच अपर्णा पाध्ये, सत्यजित आणि ऋजुता पाध्ये यांची खूप मदत झाली. सत्यजितने या बाहुल्यांना आवाज तर दिलाच पण त्याचसोबत या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली. तसंच ऋजुता पाध्ये यांनी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाची जबाबदारी घेतली असल्याचे रामदास पाध्ये यांनी सांगितलं.

मालिकेत चंदन आणि सुनयना यांच्यातील तू तू मै मै आणि त्यांच्या जीवनात घडण्याऱ्या मजेशीर गोष्टी या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या मालिकेचं खास आकर्षण म्हणजे छोटू सिंगचं रॅप साँग आणि त्याच्या गमती जमती असणार आहेत.

'घरात बसले सारे' हा बोलक्या बाहुल्यांचा धमाल कार्यक्रम ८ जून पासून संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा