SHARE

जेष्‍ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना मरणोत्‍तर 'मोहमद रफी जीवनगौरव', तर गायिका पुनम श्रेष्‍ठा यांना यावर्षीचा 'मोहम्मद रफी पुरस्‍कार' देण्‍यात येणार असल्‍याची घोषणा मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी केली. ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मदिनाच्या दिवशी दरवर्षी “स्‍पंदन आर्ट” या संस्‍थतर्फे हा पुरस्कार दिला जातो.


२४ डिसेंबर रोजी पुरस्कार सोहळा 

देशाचे उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राज्‍यपाल सी विद्यासागर राव यांच्‍या हस्‍ते या पुरस्‍काराचे वितरण करण्‍यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा २४ डिसेंबर रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संध्‍याकाळी ५ वाजता होणार असल्‍याचंही आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केलं आहे. या निमित्‍ताने प्रसाद महाडकर यांच्‍या “जिवनगाणी” तर्फे रफी यांच्‍या गाण्‍यांचा कार्यक्रमही आयोजित करण्‍यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.


कुणाला दिला जातो पुरस्कार

गेली नऊ वर्षे स्‍पंदन आर्ट तर्फे मोहम्मद रफी यांच्‍या नावाने पुरस्‍कार दिले जातात. मोहम्मद रफी यांच्‍या सोबत प्रत्‍यक्ष काम केलेल्‍या एका व्‍यक्‍तीला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्‍कार ज्‍येष्‍ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना मरोणत्‍तर देण्‍यात येणार असून, त्‍यांच्‍या पत्‍नी मधुवंती ठाकरे हा पुरस्‍कार स्वीकारणार आहेत.


यापूर्वी यांना मिळाला पुरस्कार

यापूर्वी पहिल्‍या महिला संगितकर उषा खन्‍ना, उदित नारायण यांच्‍यासह संगीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगीतकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या