Advertisement

... म्हणून नरक चतुर्दशीला करतात अभ्यंग स्नान


... म्हणून नरक चतुर्दशीला करतात अभ्यंग स्नान
SHARES
Advertisement

दिवाळी पूर्वी अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पौराणिक संदर्भांच्या आधारे ग्रामीण संस्कृतीत नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई आणि सूर्योद्यापूर्वी अंगाला उटणं आणि तेल लावून स्नान केली जाते. पहाटे लवकर उठून अंगाला तेलाचा अभ्यंग केल्यावर जाणवणारी उब, थंडीत कुडकुडत उटण्याच्या सुगंधात केलेली गरम पाण्याची आंघोळ या सर्वाचे वेगळे महत्त्व आहे. याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


प्रचलित कथा

पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी नरकासूर नावाचा एक राजा होऊन गेला. महाभारताच्या कालखंडातील या राजाने १६ हजार १०८ स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करत असे, असे सांगतात. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध केला तो दिवस होता अश्विन कृष्ण चतुर्दशीचा. नरकासुराचा वध करून सर्व स्त्रियांची भगवंतानं मुक्तता केली. नरकासुराने भगवंताकडे शेवटी एक वर मागितला की, आजच्या तिथीला पहाटे चंद्रोदयाचे वेळी जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होणार नाही. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे चंद्रोदयाच्या सुमारास अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले जाते.


आयुर्वेदात अभ्यंग स्नानचे फायदे


तेल

आयुर्वेदानुसार त्वचा हे वाताचे स्थान समजले जाते. वात कमी करण्यासाठी तेलासारखे औषध नाही! हे तेलही कोणते असावे, ते कोणत्या द्रव्यांनी सिद्ध केलेले असावे याबद्दल आयुर्वेदात सांगितले आहे. अभ्यंगासाठीच्या तेलाचा ‘बेस’ तिळाच्या तेलाचाच असावा. हे तेल वातघ्न आणि सुगंधी द्रव्यांनी सिद्ध करावे. लोद्र, दशमूळ, नागरमोथा, सुगंधी कचोरा, चंदन ही द्रव्ये यात वापरतात. यष्टीमधु (ज्येष्ठमध), उपळसरी, विडंग ही त्वचेसाठी चांगली असणारी द्रव्येही अभ्यंगासाठीच्या तेलात वापरतात. त्वचेला संसर्गापासून वाचवणारी द्रव्येही तेलात असावीत. आंबेहळद, विडंग हे संसर्गाच्या प्रतिबंधाचे काम करतात.


उटणे

आंघोळ करताना साबण लावणे टाळले तरच उत्तम. साबण त्वचेच्या रंध्रांमधील तेल धुवून टाकतो. तेलाचे फायदे मिळावेत म्हणून साबणाऐवजी उटण्याची आंघोळ करावी. उटणे लावून आंघोळ केल्यानंतर त्वचा तेलकट राहत नाही. पण त्वचेच्या रंध्रांत झिरपलेले तेल धुवूनही टाकले जात नाही. उटण्याच्या पावडरीत वाळा, नागरमोथा, कचोरा, अनंतमूळ (उपळसरी), आवळा ही द्रव्ये वापरलेली असावीत असे सांगितले आहे. ही द्रव्येही वात दूर करणारी आणि सुगंधी आहेत. काही लोक उटण्यात अगरू, देवदारू ही द्रव्येही वापरतात. पण ती तुलनेने खूप महाग आहेत.


अभ्यंग

थंडीत त्वचा कोरडी पडू लागते. कोरडय़ा त्वचेला जीवाणू किंवा बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कोरड्या त्वचेसाठी तेलाचा मसाज आणि उटण्याची आंघोळ फायदेशीर ठरते. पण अभ्यंगाचा आणखी एक उपयोगही सांगितलेला आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींना हिवाळा त्रासदायक ठरतो. थंडीमुळे त्वचेच्या वरच्या भागात असलेल्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. ही प्रक्रिया रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरते. त्वचेला तेलाचा मसाज मिळाल्यावर या रक्तवाहिन्या काहीशा विस्तारतात आणि रक्तदाब पूर्ववत होण्यास मदत होते.

संबंधित विषय
Advertisement