Advertisement

गणेशोत्सव २०१९ : ब्रिटिशकाळात असं व्हायचं गणपतीचं विसर्जन, पाहा ऐतिहासिक व्हिडिओ

भारतात १९४६ साली ब्रिटिशांच्या काळात गणपती विसर्जन कशा प्रकारे केलं जायचं? याचा एक व्हिडिओ मुंबई लाइव्हच्या हाती लागला आहे.

गणेशोत्सव २०१९ : ब्रिटिशकाळात असं व्हायचं गणपतीचं विसर्जन, पाहा ऐतिहासिक व्हिडिओ
SHARES

मोबाइल आणि कॅमेरामुळे प्रत्येक क्षण कॅप्चर केले जातात. सध्याच्या घडीला ते काही कठीण नाही. पण ब्रिटिशांच्या काळात अमुक एका घटनेची नोंद कॅमेऱ्यात करणं म्हणजे मोठंच काम म्हणावं लागेल. कारण तेव्हा तंत्रज्ञान म्हणावं तितकं प्रगत नव्हतं. असं असतानाही भारतात १९४६ साली ब्रिटिशांच्या काळात गणपती विसर्जन कशा प्रकारे केलं जायचं? याचा एक व्हिडिओ मुंबई लाइव्हच्या हाती लागला आहे.


'१९४६' चं गणपती विसर्जन

'ब्रिटिश पाथे' नावाच्या एका ब्रिटिश कंपनीनं तेव्हाच्या बातम्या आणि डॉक्युमेंट्रीज बनवल्या आहेत. यात भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेल्या काही घटनांचं व्हिडिओ शूटिंगही आहे. यापैकी एक घटना म्हणजे १९४६ सालचं गणपती विसर्जन. महाराष्ट्रात गणपती आणि गणपती म्हटलं की विसर्जनाची मिरवणूक या दोन महत्वाच्या गोष्टी.


गणेशोत्सवावेळची 'जुनी मुंबई'

हँगिंग गार्डनमधून दिसणाऱ्या पूर्ण गिरगांव चौपाटीच्या दृश्यानं व्हिडिओची सुरवात होते. मग डोक्यावरून पाटावर विराजमान झालेल्या गणरायाला घेऊन जाणारे मुंबईकर दिसतात. विजार-लेंगा, धोतर आणि हाफ चड्डीतली साधी माणसं. तेव्हाचे पोलिसही दिसतात. चौपाटीवर जाणाऱ्या लोकांच्या झडत्या घेणं हे ही तितकंच जुनं आहे हेही दिसून येईल. व्हिडिओत नळभागाचा काही भाग दिसतो. इथलं गोल देऊळ तुम्हांला लगेच ओळखू येईल. आताचं मात्र या देवळाचं रूपडं थोडं बदललं आहे.


१९३० सालचा फोटो

लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले. त्यानंतर घरा घरात विराजमान होणारा बाप्पा सार्वजनिक मंडळांमध्ये देखील होऊ लागला. याचा दाखला देणारा आणखी एक फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. १९३० साली गणपती बाप्पाच्या विसर्जना दरम्यान होणारी गर्दी आणि गर्दीला आवरणारा ब्रिटिश अधिकारी हे तुम्हाला या फोटोत पाहायला मिळेल. आता फक्त ब्रिटिश नाहीत.  मात्र विसर्जनाचा उत्साह, लोकांची लगबग, पोलिसी बंदोबस्त मात्र आहे तसाच आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा