ढोल ताशांच्या गजरात चेंबूरमध्ये गुढीपाडवा मिरवणूक


  • ढोल ताशांच्या गजरात चेंबूरमध्ये गुढीपाडवा मिरवणूक
SHARE

चेंबूर - गुढी पाडव्यानिमित्त अनेक ठिकाणी मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राजकीय पक्षांसह शाळकरी मुले आणि तरुण-तरुणींनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सकाळी 8 वाजता मिरवणुकांना सुरुवात होणार होती. मात्र साडे-दहा वाजण्याच्या सुमारास सर्व ठिकाणी मिरवणुका सुरू झाल्या. त्यानंतर दुपारी 1 च्या दरम्यान सर्व मिरवणुका चेंबूर नाका येथे एकत्र आल्या आणि त्यानंतर याठिकाणी समारोप करण्यात आला. चेंबूर प्रतिष्ठान, इलेवन पिलर, नगरसेविका आशाताई मराठे या सर्वांनी आपापल्या परिसरातून मिरवणुकांना सुरुवात केली. चेंबूर प्रतिष्ठानची मिरवणूक कोकण नगर, चेंबूर कॉलनी, डायमंड उद्यान आणि चेंबूर नाका अशी होती. तर आशाताई मराठे यांची मिरवणूक सुभाष नगर, खारदेव नगर, डायमंड उद्यान आणि त्यानंतर चेंबूर नाका येथे पोहोचली. तर इलेव्हन पिलर या सामाजिक संस्थेने देखील सुभाषनगर येथून मिरवणुकीला सुरुवात केली होती. त्यानंतर ही मिरवणूक देखील चेंबूर नाका येथे दाखल झाली होती.

डुप्लीकेट हिरो ठरले आकर्षण

आशाताई मराठे यांच्या मिरवणुकीमध्ये ढोल ताशांसह काही डुप्लीकेट कलाकारांनी देखील सहभाग घेतला होता. त्यामुळे ही मिरवणूक मोठी आकर्षक ठरली होती. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी झुबंड उडाली होती.

विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक संदेश
चेंबूरमधील या मिरवणुकीमध्ये अनेक शाळकरी मुलांनी देखील सहभाग घेत सामाजिक संदेश दिला. झाडे वाचवा, पाणी वाचवा, मुलींना वाचवा असे लिहिलेले फलक हातात घेऊन मुलं सामाजिक संदेश देताना या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या