Advertisement

Navratri 2021 : ‘या’ मंदिरांमध्ये घ्या आदिमातेचे दर्शन

नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारपासून प्रार्थना स्थळं सर्वांसाठी खुली झाली. याचचं औचित्य साधत आम्ही मुंबईतल्या देवीच्या मंदिरांची माहिती देत आहोत. या मंदिरात तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता.

Navratri 2021 : ‘या’ मंदिरांमध्ये घ्या आदिमातेचे दर्शन
SHARES

महिषासूराच्या नाशासाठी अवतार घेणाऱ्या दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. ७ ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी घटस्थापना झाली. यासोबतच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून प्रार्थना स्थळं भाविकांसाठी खुली झाली. याचचं औचित्य साधत मुंबईतल्या प्रसिद्ध देवीच्या मंदिरांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. या मंदिरांमध्ये तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता.  

१) मुंबादेवी मंदिर, काळबादेवी

मुंबईची ग्रामदैवत, अशी मुंबादेवीची ओळख. मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबईचे नामकरण झाल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मुंबादेवी मुंबईतील आद्य रहिवासी कोळी समाजाची आराध्य दैवत. 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून मुंबादेवीचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येते. नवरात्रीत पाठ वाचनाबरोबर नवमीला हवन केले जाते.

2) काळबादेवी मंदिर, काळबादेवी

काळबादेवी मंदिरात नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा केला जातो. काळबादेवीला मांसाहारी नैवैद्य चालत नाही. परंपरेनुसार धार्मिक विधिवत पूजा केली जाते. नवमीला देवीसमोर हवन केले जाते.  दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते.

3) महालक्ष्मी मंदिर

मुंबईतल्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे महालक्ष्मी मंदिराची देखील चांगली ख्याती आहे. १७८५ साली मंदिरात देवीची स्थापना करण्यात आली. या मंदिरात महालक्ष्मी, कालिका, महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहेत.

४) महाकाली मंदिर, पायधुनी

पायधुनी इथल्या महाकाली मातेच्या मंदिराची स्थापना १७६२ साली करण्यात आली होती. २५० वर्षांपासून ही देवी या परिसरात वास करते असा तिथल्या रहिवाशांचा विश्वास आहे. मुंबईत ब्रिटिशकालीन विहरी आहेत. या विहरींमध्येच या देवीचा उगम झाला. त्यानंतर तिथेच देवीची स्थापना करण्यात आली.

५) शीतलादेवी मंदिर, माहीम

मुंबईतल्या सात बेटांपैकी माहीम हे एक बेट. या बेटावर वसलेले शीतलादेवीचे सुंदर मंदिर. कोळी समाजाचे कुलदैवत असलेल्या शीतलादेवीचे मंदिर साडेतीनशे वर्षे जुने आहे. मंदिरातील देवीची मूर्ती पाषाणात घडवलेली आहे. मूर्तीवर चांदीचा मुखवटा चढवलेला आहे.

६) सातआसरा मनमालादेवी मंदिर, माहीम

माहिमची ग्रामदेवता म्हणून सातआसरा मनमालादेवीची ख्याती आहे. मनमाला देवीचे मंदिर आहे तिथे तलाव होते. त्या तलावातून मनमाला देवीची मूर्ती प्रकट झाल्याचे म्हटले जाते. 

यासोबतच खोकलादेवी, शितलादेवी, जरीमरी, केवडावती, चंपावती, मनमाला देवी प्रकट झाल्याचे म्हटले जाते. तलावाला विहिरीचे रूप देण्यात आले आहे आणि विहिरीच्याच बाजूला मंदिर बांधून मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्रीमध्ये देवीला चांदीची छत्री घातली जाते. 

७) जाखादेवी मंदिर, दादर

प्रभादेवी मंदिरापासून थोड्याच अंतरावर जाखादेवीचे मंदिर आहे. मंदिराचे मूळ रत्नागिरी गावातील गणपतीपुळे इथले आहे. मंदिराची स्थापना अनंत विठ्ठल कवळी यांनी १०० वर्षांपूर्वी केली. अनंत कवळी राहत असलेल्या घराजवळच्या तलावात जाखादेवीची पुरातन मूर्ती सापडली. मूर्ती भग्नावस्थेत असल्याने त्यांनी संगमवरी मूर्तीची स्थापना केली.

८) गोलफादेवी मंदिर, वरळी

गोलफादेवी हे उंच टेकडीवर वसलेले कोळी बांधवांचे मंदिर आहे. मंदिराची बांधणी बिंब राजाने केल्याचे इथले रहिवासी सांगतात. मंदिरात साकबादेवी, गोलफादेवी आणि हरबादेवीची मूर्ती आहे. काळ्या पाषाणातील ही मूर्ती आहे.

९) हरबादेवी मंदिर, विरार

विरार इथल्या टाटोळे तलावाच्या परिसरात असलेली देवी जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. १९६൦ साली या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. 

ब्रिटीशकाळात विरार स्थानकाचे बांधकाम सुरू होते. पण या कामात देवीच्या मूर्तीचा अडथळा येत होता. त्यामुळे देवीचे मंदिर हलवण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण क्रेननं देवीची मूर्ती हलवता येत नव्हती. तेव्हा हनुमंतदास बैरागी यांनी दैवी शक्तीनं मूर्ती स्थलांतरीत केली.



हेही वाचा

नवरात्रोत्सवानिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

Guidelines For Navratri : नवरात्रोत्सवसाठी सरकारच्या गाईडलाईन जारी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा