मोगवीरा एससी आणि स्टार ऑफ कॅनरा एससी या दोन्ही संघानी अटीतटीच्या लढतीत उपांत्य फेरीत विजय मिळवत ११ व्या ए आर कुडरोली मेमोरीअल नॉकआउट फुटबॉल टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. ही स्पर्धा कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली होती.
क्रॉस मैदान येथील केएसए ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या या लढतीत मोगवीरा स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सत्या विजया स्पोर्टस क्लबमधील सामन्यात दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ करण्यात आला. पण पहिल्या सत्रात दोन्ही संघाला एकही गोल करण्यात यश आले नाही. मात्र दुसऱ्या सत्रात मोगवीराकडून आक्रमक खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला दाबत जॉन कौथीनो याने ४२ व्या मिनिटाला गोल केला. जॉनने महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे मोगवीरा संघाने १-० अशा फरकाने विजया स्पोर्ट्सचा पराभव केला.
उपांत्य फेरीत कॅनरा संघाने बॉम्बे फोर्ट एससीला ४-३ ने मात देत विजय साकारला. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघाला एकही गोल करण्यात यश आले नाही. शेवटी टाय ब्रेकरमध्ये कॅनराच्या खेळाडूंनी ४ गोल करत संघाला विजय मिळवून दिला. कॅनराच्या नेहा शेट्टी, विराज शेट्टी, ग्लेन मोराज आणि रॉयस्टॉन कस्टेलीनो यांनी गोल केले, तर बॉम्बे फोर्टच्या निखील शेट्टी, प्रसन्ना शेट्टी आणि नितीन कोटीयनकर यांनी गोल केले.