कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत. यामध्ये वृद्धांसह तरूणांचाही समावेश आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून रोज रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे भितीचं वातावरण आहे. मात्र, या वातावरणातच एक दिलासा देणारी बातमी आहे. एका १०२ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. सुशीला फाटक असं या आजींचं नाव आहे.
कोरोनाला घाबरु नका, कोरोनाशी दोन हात करा. तुम्ही कोरोनावर नक्की मात कराल आणि बरे व्हाल, असा मोलाचा सल्लाही या आजींनी दिला आहे. आजींना डिस्चार्ज देताना हॉस्पिटलमधील नर्स, डॉक्टर, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांनी केक कापून आजींचं अभिनंदन केलं आणि आनंदाने त्यांना घरी पाठवलं
सुशीला पाठक या मुंबईतील अंधेरी येथे राहतात. ७ एप्रिलला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, बेडच्या कमतरतेमुळे त्यांना ठाण्यातील होरायझन प्राईम या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन आठवडे फाटक यांच्यावर उपचार सुरू होते. १०२ वर्ष वय असेलेल्या आजींचे नेमके पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आजींचे दोन्ही नातू डॉक्टर सुजित बोपर्डेकर आणि डॉक्टर अभिजीत बोपर्डेकर यांनी आजींची इच्छाशक्ती पाहिली आणि आजी कोरोनावर सहज मात करतील हे दोघांच्या लक्षात आल. त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या आजीवर उपचार करण्याची पूर्ण मुभा दिली. १५ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्या आजींनी कोरोनावर मात केली.
उपचारादरम्यान देखील आजींनी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचं पालन केलं होते. तसंच आपल्याला कोरोना झाला आहे म्हणजे आपल्याला काहीतरी भयंकर झालंय असा निगेटिव्ह विचार या आजींनी कधीच केला नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अगदी सकारात्मकतेने आजींनी पंधरा दिवस कोरोनाचा सामना केला आणि कोरोनावर मात करून आजी त्यांच्या घरी सुखरूप परतल्या. आजींनी एक प्रकारे आम्हाला देखील सकारात्मकतेचा धडा दिला आहे असं मत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व्यक्त केलं.
हेही वाचा
जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता?
गर्दी टाळा, लसीकरणाचा मेसेज आल्यावरच घराबाहेर पडा, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन