मुंबईतील वरळी परिसराला कोरोनानं चांगलचं टार्गेट केलं आहे. वरळी परिसर हा महापालिकेच्या जी दक्षिण विभागात येत असून, या विभागाता सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळं येथील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु, आता वरळीकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. वरळीतील कोरोनाच्या संशयित १२९ रुग्णांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आलं आहे. क्वारंटाईनमुक्त झालेल्या नागरिकांचं वरळीतील रहिवाशांबरोबरच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी टाळ्या वाजवून स्वागत केला.
वरळी कोळीवाडा परिसरातील कोरोना हायरिस्क झोनमधील १२९ व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून वरळीतील पोद्दार रुग्णालयात विलीगीकरण करण्यात आलं होतं. १४ दिवसांच्या विलगीकरणानंतर परतलेल्या रहिवाशांचं बुधवारी टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलं. सोमवारी आणि मंगळवारी सर्वांचे स्वॅब नमुने तपासणी केल्यावर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले.
सर्व जण सुखरूप घरी आल्यावर शेजाऱ्यांनीही मोठ्या मनानं त्यांचं स्वागत केलं. तत्पूर्वी वरळी कोळीवाडा परिसरातील ८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परत आले आहेत.