Advertisement

महिलेच्या पोटात १५ सेमीची गाठ, डी. वाय. पाटील हाॅस्पिटलमध्ये दुर्मिळ शस्त्रक्रिया


महिलेच्या पोटात १५ सेमीची गाठ, डी. वाय. पाटील हाॅस्पिटलमध्ये दुर्मिळ शस्त्रक्रिया
SHARES

मानवी शरीरातील अंतर्भाग हा अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचा असतो. त्याला जराही इजा झाली की त्याचा परिणाम संपूर्ण शरीराला भोगावा लागतो. असाच काहीसा अनुभव मराठवाड्यातील एका महिलेसोबत आला. यकृतात तयार झालेल्या अनैसर्गिक गाठीमुळे आता आपल्याला आपला जीव गमवावा लागतो की काय या भीतीत ती होती. पण मुंबईत झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तिला जणू जीवनदानच मिळालं आहे.


कठीण, दुर्मिळ शस्त्रक्रिया 

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातील मालती देशमुख या ५२ वर्षाच्या महिलेच्या पोटात १५ सेमी अाकाराची गाठ झाली होती. या गाठेला वैद्यकीय भाषेत हिमँजिओमा असं म्हणतात. ती गाठ पोटात फुटल्यास रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो. या हिमँजिओमा नावाची गाठ यकृतातून बाजूला करणं ही शस्त्रक्रिया अत्यंत कठीण आणि दुर्मिळ असते. 

सुरुवातीला ही महिला आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात येथील शल्यचिकित्सक डॉ. सुधीर देशमुख यांच्या देखरेखेखाली उपचार घेत होती. यावेळी डॉ. देशमुख यांना  महिलेच्या यकृताच्या आत रक्तवाहिन्यांनी तयार झालेली१५ सेमीची गाठ आढळून आली.


मराठवाड्यात उपचाराचा अभाव

अशी शस्त्रक्रिया मराठवाड्यात कुठेच होत नसल्याने त्या महिलेला मुंबई गाठावी लागली. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात मालती दाखल झाल्या. डॉ. कैलास जवादे आणि त्यांच्या टीमने मालती यांच्या यकृतावर शस्त्रक्रिया केली. रुग्णालयाचे सीईओ डॉ. अनुपकुमार कर्माकर आणि डीन डॉ. सुरेखा पाटील यांचंही यासाठी सहकार्य लाभलं.  एवढेच नव्हे तर ही शस्त्रक्रिया अत्यंत महाग आणि गोरगरीब रुग्णांना परवडणारी नसताना डॉ. जवादे यांनी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आणि रुग्णालयात सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत ही शस्त्रक्रिया करून एक नवी सुरुवात केली आहे.

डॉ. जवादे हे 'दोस्त-मुंबई' नावाच्या संस्थेच्या माध्यमातून अवयवदान, किडनी आजार, यकृत उपचार, कर्करोग आदींसाठी जनजागृतीचे अभियान आणि मोहीम राबवत असतात. देहू-आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारीत ते वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून फिरत्या रुग्णालयात वारकऱ्यांना आरोग्य सेवा देतात.


 ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. त्यामुळे  ती तब्बल सहा तास चालली. त्यानंतर या महिलेला तीन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. तेथे त्यांच्यावर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार झाले. अाता महिलेची तब्येत पूर्ववत झाली असून या शस्त्रक्रियेसाठी एक पैसाही खर्च करावा लागला नाही.  
- डॉ. कैलास जवादे



हेही वाचा -

अखेर धनश्रीला मिळाले हृदय

'त्यांनी' दिले सहा जणांना जीवदान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा