Advertisement

मुंबईतील खासगी रुग्णालयांत २४ तास लसीकरण


मुंबईतील खासगी रुग्णालयांत २४ तास लसीकरण
SHARES

मुंबईतील खासगी रुग्णालयांत २४ तास आणि आठवड्याचे ७ही दिवस लसीकरण केलं जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेनं केंद्र व राज्य सरकारकडे पाठवला आहे. राज्य सरकारनं या प्रस्तावाला मान्यता दिली असून केंद्र सरकारच्या परवानगीची पालिकेला प्रतीक्षा आहे.

केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्याची विनंती पालिकेने केंद्र शासनाकडे केली आहे. त्याला मान्यता मिळाल्यास दररोज एक लाख नागरिकांचे लसीकरण होऊ शकणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईत लसीकरण सुरू आहे. लसीकरण प्रमाण वेगाने वाढवण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात बुधवारी एका विशेष आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सार्वजनिक आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, महापालिका क्षेत्रातील विविध खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

२४ तास कार्यरत राहणारी लसीकरण केंद्रे सुरू झाल्यानंतर दररोज १ लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे लक्ष्य गाठता येणार आहे. मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ३० लाख आहे. ही बाब लक्षात घेतल्यास व दिवसाला १ लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास महिन्याभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होण्याची शक्यता आहे.

सध्या सुरू असलेली लसीकरण केंद्रे ८ तास ते १२ तास कालावधीसाठी कार्यरत आहेत. या लसीकरण केंद्रांद्वारे ९ मार्च रोजी एका दिवसात ३८ हजार २६६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. 

लसीकरण करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची नोंदणी ‘कोविन अ‍ॅप’वर होणे गरजेचे आहे. तसेच यासाठी रुग्णालयांमध्ये जाऊन थेट नोंदणीचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहे. रुग्णालयांच्या स्तरावर  संकेतस्थळावर नोंदणी करण्यात अडचणी असल्याची बाब काही खासगी रुग्णालयांद्वारे बैठकीदरम्यान मांडण्यात आली. याबाबत महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी व माहिती तंत्रज्ञान खात्यातील अधिकारी यांचा समावेश असलेली पथक तात्काळ स्थापन करण्याचे आणि हे पथक ११ मार्च, २०२१ पासून महापालिकेच्या ‘१९१६’ या दूरध्वनी क्रमांकाशी संलग्न करण्याचे आदेश दिले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा