Advertisement

Coronavirus Updates: ९ लाख नागरिकांचे सर्वेक्षण, २४५५ पथके कार्यरत

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्याच्या आरोग्य विभागानं 'क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना' राबवली आहे.

Coronavirus Updates: ९ लाख नागरिकांचे सर्वेक्षण, २४५५ पथके कार्यरत
SHARES

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्याच्या आरोग्य विभागानं 'क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना' राबवली आहे. ज्या भागात कोरोना रूग्णांचं क्लस्टर सापडले तिथे घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचं काम केलं जात आहे. त्यासाठी राज्यातील १८ जिल्ह्यात एकूण २४५५ पथके तयार करण्यात आली आहेत. कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षण केलं जात आहे.

आतापर्यंत ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचं या माध्यमातून सर्वेक्षण झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कंटेनमेंट कृती आराखड्यानुसार ज्या भागात कोरोनाचे ३ किंवा त्यापेक्षा जास्त पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले. तेथे कृती आराखड्यानुसार कारवाई अपेक्षित आहे. मात्र, खबरदारी म्हणून सध्या एक रुग्ण जरी आढळून आला, तरीही सर्वेक्षणाचं काम केलं जात असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

कंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्या भागाचा नकाशा तयार केला जातो. घरांची संख्या आणि लोकसंख्या विचारात घेऊन पथके तयार केली जातात. सकाळी ८ ते संध्याकाळी ४ या वेळात पथकातील सदस्य घरोघरी जाऊन नागरिकांना सर्दी, ताप खोकला, श्वास घेताना होणारा त्रास आदींबाबत माहिती जमा करतात. लक्षणांनुसार रुग्णांची यादी तयार केली जाते. ती संबंधित आरोग्य अधिकाऱ्याला दिली जाते. ज्या पथकाला जो विभाग नेमून दिला आहे, त्याच पथकाने पुढील १४ दिवस दररोज सर्वेक्षण करायचे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संशयित रुग्ण आढळल्यास संबंधित आरोग्य अधिकारी मोठ्या रुग्णालयाकडे त्याला पाठवतो, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. या पथकामध्ये आरोग्य कर्मचारी, एएनएम, हिवताप निर्मूलन कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आवश्यकता भासल्यास नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा समावेश केला जातो.

अशी आहेत पथकं

  • पुणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४१३ पथके
  • मुंबई महापालिका क्षेत्रात २९२ पथके
  • नागपूर महापालिका क्षेत्रात २१० पथके 

राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये एकूण २,४५५ पथके सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह पिंपरी चिंचवड महापालिका (३८), पुणे ग्रामीण भाग (३३१), ठाणे जिल्ह्यातील ठाणे महापालिका(१४०), कल्याण डोंबिवली महापालिका (८२), नवी मुंबई महापालिका (१६९), उल्हासनगर (९०), रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका (६५), रत्नागिरी (५४), अहमदनगर जिल्हा (१५) व , यवतमाळ (५२), नागपूर (२१०) क्षेत्रात सध्या ही सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा