Advertisement

मुंबई लाईव्ह इम्पॅक्ट : सायन रुग्णालय करणार दीपाच्या मुलांचा मोफत उपचार


मुंबई लाईव्ह इम्पॅक्ट : सायन रुग्णालय करणार दीपाच्या मुलांचा मोफत उपचार
SHARES

सरकारी रूग्णालयातील हलगर्जीपणाचा फटका एका दाम्प्त्याला चांगलाच बसला. सायन रुग्णालयात गर्भपाताची शस्त्रक्रिया केल्यानंतरही महिलेची प्रसूती झाली. त्यामुळं आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही या कुर्ल्यातील यशवंत आणि दीपा कदम या गरीब दाम्प्त्याला तिसऱ्या बाळाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. रुग्णालयाच्या या चुकीचा बळी अाणखी कोणी ठरू नये म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

'मुंबई लाइव्ह' ने याचा स्पेशल रिपोर्ट दिल्यानंतर सायन रुग्णालयाच्या अधिष्ठाता जयश्री मोंडकर यांचे डोळे उघडले. मोंडकर यांनी दीपा कदम यांच्या तीनही मुलांचे सर्व वैद्यकीय उपचार सायन रुग्णालयात मोफत दरात करण्यात येण्यात असल्याचं सांगितलं अाहे. मात्र, या घटनेमुळे सरकारी रुग्णालयाचा अक्षम्य निष्काळजीपणा समोर अाला अाहे.


काय आहे प्रकरण?

कुर्ल्यातील सुंदर बाग परिसरात राहणाऱ्या पत्नी दीपा कदम तिसऱ्यांदा गरोदर राहिल्या. तिसरं अपत्य नको असल्याने त्यांनी गर्भपात करून गर्भाशयाचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. गर्भपातासाठी दीपा १२ जून २०१७ सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात आल्या. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं आम्हाला २ महिन्याच्या अर्भकाचा गर्भपात करायचा आहे, असं त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. एन. एन. चव्हाण यांना सांगितलं. त्यानुसार रुग्णालयानं गर्भपाताची परवानगी दिल्यानंतर डाॅक्टरांनी दीपाच्या गर्भाशयाच्या आॅपरेशनची तयारी केली.


डॉक्टरांचा हलगर्जीपणा

गर्भपाताच्या शस्त्रक्रियेनंतर दीपाला शारीरिक त्रास होऊ लागला. त्यामुळं त्या पुन्हा सायन रुग्णालयात डॉक्टरांकडे गेल्या असता डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशननंतर अशा प्रकारचे त्रास होतातच असं म्हणत उडवाउडवीची उत्तरं दिली. ऑपरेशनच्या ३ महिन्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये दीपाच्या शरीरात काहीसे बदल दिसून आले. हे बदल त्यांना विचित्र वाटल्यानंतर त्यांनी थेट सायन रुग्णालय गाठलं आणि तपासणी करून घेतली. त्यानंतर दीपा ८ महिन्यांची गर्भवती असताना सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाच्या मेंदूत रक्तपुरवठा होत नाही आणि त्याच्या यकृतावर सूज आहे, असं म्हणत त्यांना मुदतपूर्व प्रसूती करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हे दाम्पत्य रुग्णालयात दाखल झाल्यावर दीपाची नैसर्गिक प्रसूती करण्याऐवजी सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. दीपाने १६ डिसेंबर रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर बाळाची तपासणी केल्यानंतर बाळ पूर्णतः बरं असल्याचं समजलं. मात्र, डाॅक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल त्यांचा संताप अनावर झाला.

आपल्यावर जी वेळ आली ती दुसऱ्या कोणावर येऊ नये यासाठी आम्ही लढत असल्याचे यशवंत कदम यांनी सांगितल. आमची आर्थिक परिस्थिती नसूनही आमच्यावर ही वेळ आली आहे. गर्भपात अपयशी होऊ शकतो याची आम्हाला काहीही माहिती नव्हती किंवा त्याबद्दल आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंही नाही. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली असं यशवंत यांनी सांगितलं.


स्टाफकडून चूक

या घटनेबाबत सायन रुग्णालयाच्या अधिष्ठाता जयश्री मोंडकर म्हणाल्या की, वैद्यकीय शास्त्रामध्ये अपयशी गर्भपात होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. कदम यांनी या गोष्टीला मोठं करू नये. रुग्णालयाच्या स्टाफकडून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही याचीदेखील कबुली त्यांनी दिली. यशवंत आणि दीपा यांची अार्थिक परिस्थिती नसल्याने त्यांच्या तीनही मुलांचे वैद्यकीय उपचार मोफत करण्यात येतील. ज्यामध्ये एमआरआय , सिटीस्कॅन आणि अन्य मोठ्या वैद्यकीय चाचण्या असतील अशी ग्वाही अधिष्ठाता मोंडकर यांनी दिली.



हेही वाचा - 

जाणून घेऊया ब्रेन ट्यूमर बद्दल... अाज जागतिक ब्रेन ट्यूमर दिन

जे. जे. हॉस्पिटलची बत्तीगुल



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा