Advertisement

मुंबईतील जम्बो रुग्णालये बंद करणार, महापालिकेचा निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भावही आता कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील जम्बो रुग्णालये बंद करणार, महापालिकेचा निर्णय
SHARES

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता मुंबईतील सर्व जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मात्र केवळ मरोळ इथले सेव्हन हिल्स आणि चुनाभट्टीजवळील के. जे. सोमय्या जम्बो रुग्णालय सुरू राहणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भावही आता कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेले गोरेगावचे नेस्को, बीकेसी, मुलुंड, भायखळा येथील रिचर्डसन अण्ड क्रुडास, वरळीचे एनएससीआय, कांजुरमार्ग, दहिसर आणि मालाड ही जम्बो रुग्णालये पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

लवकरच ही रुग्णालये पूर्णपणे बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयांतील वैदयकीय उपकरणांसह सर्व साहित्य मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना आवश्यकतेनुसार देण्यात येईल.

मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वेगाने होणारी रुग्णवाढ लक्षात घेता महानगरपालिकेने सर्वप्रथम बीकेसी येथे पहिले जम्बो करोना रुग्णालय सुरू केले. त्यानंतर हळूहळू मुंबईत दहा जम्बो रुग्णालये सुरू करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मोजकीच जम्बो रुग्णालये शहरात सुरू ठेवली होती, अन्य रुग्णालये बंद केली होती. यातील काही रुग्णालये बंद करण्यात आली होती.

आवश्यकता भासल्यास ती पुन्हा सुरू करता यावी यादृष्टीने तेथे यंत्रणा ‘जैसे थे’ ठेवण्यात आली होती. चौथी लाट सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जम्बो रुग्णालये बंद करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता.

कोरोनाच्या चौथ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढली तरी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या तुलनेने फार कमी होती. सध्या रुग्णालयात १९२ रुग्ण दाखल आहेत. दैनंदिन सुमारे अडीचशे रुग्ण नव्याने आढळत असले तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या २० पेक्षाही कमी आहे.

आवश्यकता भासल्यास या खाटा कोरोनाच्या रुग्णांसाठी सुरू केल्या जातील. त्यामुळे रुग्ण काही प्रमाणात पुन्हा वाढले तरी खाटांची कमतरता भासणार नाही. जम्बो रुग्णालयांचा व्यवस्थापन खर्च मोठा आहे. सध्या या रुग्णालयांची तितकी आवश्यकता नसल्यामुळे ती बंद करण्यात येत आहेत.



हेही वाचा

मुंबईत मंकीपॉक्स अलर्ट, कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सज्ज

चिंता वाढली, मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा