SHARE

घरात मुल रांगायला लागलं की त्याला सांभाळतांना आई-बाबांची दमछाक उडते. अशावेळी मुल मोठे होईपर्यंत त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. जर का पालकांचे दुर्लक्ष झाले तर ते मुल कधी काय करेल याचा नेम नाही. 


कारण भाईंदरमध्ये पालकांची नजर चुकवत ११ महिन्यांची संगीता (नाव बदलेलेलं) रांगत असताना तिने काहीतरी गिळले. त्यानंतर तिचे रडणे, हसणे देखील कमी झाले. तिच्या आई-वडिलांना वाटले की, कदाचित तिला बरे वाटत नसेल म्हणून त्यांनी तीला मीरारोड येथील शिशुरोग तज्ज्ञांकडे नेले. यावेळी डॉक्टरांनी संगीताला मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पालकांनी बाळाला वोक्हार्टमध्ये दाखल केले. तेव्हा संगीताने चक्क सेफ्टी पिन गिळल्याचे तपासणीतून निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने तिची सर्जरी केली. 


अन्ननलिकेच्या मार्गाने गिळलेल्या या सेफ्टी पिनची वरील बाजू उघडी असल्यामुळे चिमट्याच्या साहाय्याने काढणे फारच कठीण होते. मुलगी लहान असल्यामुळे ती फारच अस्वस्थ होती. त्यामुळे तिला गुंगीचा सौम्य डोस देण्यात आला. अन्ननलिकेत अडकलेली पिन तोंडातून काढण्यास अडथळा येत असल्यामुळे एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. एन्डोस्कोपीच्या मदतीने पहिल्यांदा ती पिन अन्ननलिकेतून पोटात घेतली आणि नंतर ती पिन उलटी केली. म्हणजेच तिचा पाठचा भाग वरती आणला आणि रॅट टूथ आणि हूडच्या साहाय्याने अन्ननलिकेतून बाहेर काढला. 

डॉ. ललित वर्मा, गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट ,वोक्हार्ट हॉस्पिटल

ही सेफ्टी पिन काढल्यानंतर मुलीला २४ तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आले. सिटी स्कॅन आणि स्कोप केल्यानंतर मुलीला कोणताही गंभीर इजा झाली नव्हती. योग्य आणि तात्काळ उपचारामुळे तिचा जीव वाचवला, असे डॉ. वर्मा यांनी सांगितले.


असे काही झाल्यास पालकांनी लगेचच त्या बाळाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे जेणेकरून बाळाला लगेच उपचार मिळतील. कारण अनेकदा केवळ हॉस्पिटलमध्ये येण्यास उशीर झाल्यामुळे लहान मुलांचे प्राण वाचवणे कठीण होते. 

रवी हिरवानी, केंद्रप्रमुख,वोक्हार्ट हॉस्पिटल

संबंधित विषय
ताज्या बातम्या