Advertisement

ट्राॅमा हाॅस्पिटलमध्ये नाही एनआयसीयू विभाग, बालकं दगावण्याच्या घटना वाढल्या


ट्राॅमा हाॅस्पिटलमध्ये नाही एनआयसीयू विभाग, बालकं दगावण्याच्या घटना वाढल्या
SHARES

जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा हाॅस्पिटलमध्ये प्रसुती विभाग आहे, पण इथं नवजात शिशू अतिदक्षता विभाग अर्थात एनआयसीयू नाही. अशावेळी कमी वजन वा इतर समस्या असलेल्या नवजात बालकांना त्वरीत उपचार मिळत नसल्यानं ही बालकं दगावण्याच्या घटना घडतात. या बालकांना इतर रूग्णालयातील एनआयसीयूमध्ये हलवण्यात वेळ जातो आणि तात्काळ उपचाराअभावी नवजात बालकांचा मृत्यू होतो. त्यामुळे जोगेश्वरी ट्राॅमा हाॅस्पीटलमध्ये एनआयसीयू विभाग सुरू करण्याची मागणी जोगेश्वरी, आसपासचे स्थानिक आणि रूग्णांसह ट्राॅमा हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांकडूनही होत आहे.

जोगेश्वरीचे स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण मंत्री रविंद्र वायकर यांनीही ही मागणी उचलून धरली आहे. एनआयसीयू सुरू करण्याबाबत नुकतंच वायकरांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी एक पत्र लिहिलं आहे.


उपचाराअभावी नवजात बालकांचा मृत्यू

जोगेश्वरी आणि आसपासच्या परिसरातील रूग्णांना स्वस्तात उपचार मिळत असल्यानं ट्राॅमा हाॅस्पीटलमध्ये येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. दरदिवशी या हाॅस्पीटलमध्ये अंदाजे १६०० रुग्ण विविध आजारांवरील उपचारासाठी येतात. येथे प्रसूती विभाग असून दिवसाला ४ ते ५ महिलांची प्रसुती होते. प्रसुती झाल्याबरोबर काही नवजात बालकांना तात्काळ उपचारांची गरज असते. त्यातही कमी महिन्यांच्या (प्रीमॅच्युअर) आणि कमी वजनाच्या नवजात बालकांना जन्मानंतर काही मिनिटांतच आवश्यक ते उपचार मिळणं अत्यंत गरजेचं असतं. अशावेळी ट्राॅमामध्ये एनआयसीयू नसल्यानं अशा नवजात बालकांना कुपर हाॅस्पीटल वा इतरत्र हलवलं जातं. पण तेवढ्या वेळात उपचार न मिळाल्यानं अनेक नवजात बालकांचा मृत्यू होतो. त्यातच ट्राॅमा हाॅस्पीटलमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या बालरूग्णांचीही संख्या मोठी असते. अशा रूग्णांना एनआयसीयूच्या माध्यमातून ज्या सुविधा अाणि उपचार मिळायला हव्यात त्या न मिळाल्याने त्यांना इतरत्र जावं लागत आहे.


वाडिया हाॅस्पिटलची मदतीची तयारी

या पार्श्वभूमीवर ट्राॅमा हाॅस्पीटलमध्ये एनआयसीयू सुरू करण्याची मागणी होत आहे. वायकर यांनी यासाठी पुढाकार घेत काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांसमवेत बैठक घेतली होती. तर त्यानंतर वाडीया हाॅस्पीटलशी चर्चा करत ट्राॅमा हाॅस्पिटलमध्ये एनआयसीयू सुरू करण्यासाठी मदत मागितली होती. त्यानुसार वाडिया हाॅस्पिटलने मदत करण्यास तयारी दर्शवली आहे. वायकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवत एनआयसीयू सुरू करण्यासंबंधीची सूचना केली आहे.



हेही वाचा - 

जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर कार्यमुक्त

'लाइफलाइन एक्सप्रेस्' ठरणार तारणहार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा