उत्पादन परवाना रद्द, तर खटलाही दाखल

 Pali Hill
उत्पादन परवाना रद्द, तर खटलाही दाखल

मुंबई - औषध निर्मितीतील नामांकित अगदी थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून चांगली उत्पादन पद्धती असलेली कंपनी असे सर्टिफिकेट मिळालेली मे. बीडीएच इंडस्ट्रीज कंपनीला अन्न आणि औषध कंपनीनं दणका दिला आहे. गुजरातमधील मे. सिसमेड लॅबोरिटीज कंपनीकडून उत्पादीत करण्यात आलेली पॅरासिटेमाॅल टॅबलेट्स 500 एमजी ही औषधं स्वत:ची उत्पादनं म्हणून बीडीएच विकत असल्याची धक्कादायक बाब काही महिन्यांपूर्वीच एफडीएच्या कारवाईतून समोर आली होती. इतर कंपनीचे उत्पादन हे स्वत:चे उत्पादन म्हणून विकणे औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार हा प्रकार नकली औषध निर्मितीच्या कक्षेत मोडत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे एफडीएनं या कंपनीचा उत्पादन परवाना 25 आॅक्टोबरपासून रद्द केल्याची माहिती दक्षता विभागाकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. तर या कंपनीविरोधात न्यायालयीन खटलाही दाखल करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महत्त्वाचं म्हणजे ही कंपनी परदेशीही या औषधांची निर्यात करत असे. त्यामुळे एफडीएनं जागतिक आरोग्य संघटनेकडेही या कंपनीची फसवणूक लक्षात आणून दिली होती. त्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेनंही या कंपनीचं नुतनीकरण रद्द केल्यानं आता कंपनी औषधांची निर्यातही करू शकणार नाही. 35 वर्षे औषध निर्मितीत आघाडीवर असलेल्या कंपनीकडून फसवणूक होत असल्याचे समोर आल्याने तसेच त्याविरोधात कडक कारवाई झाल्याने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या कारवाईमुळे अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या अन्य कंपन्यांनाही दणका बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading Comments