Advertisement

मालाडच्या लाइफलाइन रुग्णालयाने आकारलं २१ लाखांचं बिल, गुन्हा नोंदवण्याची भाजपची मागणी

मालाडच्या लाइफलाइन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाने एका रुग्णाला तब्बल २१ लाख रुपयांचं बिल आकारलं. दुर्दैवाने तो रुग्ण मृत्यूमुखी पडला.

मालाडच्या लाइफलाइन रुग्णालयाने आकारलं २१ लाखांचं बिल, गुन्हा नोंदवण्याची भाजपची मागणी
SHARES

मालाडच्या लाइफलाइन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाने एका रुग्णाला तब्बल २१ लाख रुपयांचं बिल आकारलं. दुर्दैवाने तो रुग्ण मृत्यूमुखी पडला. परंतु जोपर्यंत पूर्ण बिल भरत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या रुग्णालय प्रशासनाचा पर्दाफाश करत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी जाब विचारला. कोविड संकटाच्या काळात सर्वसामान्य रुग्णांना लुटणाऱ्या या रुग्णालय प्रशासनावर ३०२ कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे. (bjp leader pravin darekar demands strict action against malad west lifeline multispeciality hospital who charged 21 lakh rupees bill to patient)

एसआरएमध्ये राहणाऱ्या एका रुग्णालया मालाड पश्चिमेकडील लाइफलाइन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुर्दैवाने हा रुग्ण वाचला नाही. परंतु त्याच्या उपचाराचं तब्बल २१ लाखाचं बिल आकारण्यात आलं. रुग्णाच्या कुटुंबियांनी ८ लाख भरूनही रुग्णाचा मृतदेह ताब्यात देण्यात येत नव्हता. याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तिथं धाव घेत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. 

हेही वाचा- खासगी रुग्णालयात राखीव खाटा ठेवण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ

बिलाची पडताळणी करताच हॉस्पिटलमध्ये बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस नंतर पुन्हा बायोपॅक चार्जेस म्हणजे एकाचवेळी दोन-दोन प्रकारचे चार्जेस रुग्णाच्या बिलात लावण्यात आल्याचं निर्दशनास आलं. एका पीपीई किटसाठी ३५०० रुपये लावण्यात आले. 'बायोमेडिकल वेस्ट चार्जेस २५०० रुपये प्रमाणे पूर्ण बिलात ७७ हजार ५०० रुपये आकारण्यात आले. औषधांचं बिल तब्बल १० लाख ६२ हजार रुपये आकारण्यात आलं आहे. अशाप्रकारे कोरोनाच्या संकटातही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूटमार सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे, असं प्रविण दरेकर यांनी सांगितलं. 

रुग्णालयांकडून सरकारच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखविली जात आहे. केवळ परिपत्रक काढून चालत नाही तर त्यावर नियंत्रण व त्याचं मॉनेटरिंग करणं आवश्यक आहे, मात्र इथं हा अभाव आहे. म्हणूनच ३०० रुपयांचे किटचे ३ हजार ५०० रुपयाचे बिल लावलं जातं, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली.

महापालिकेने लूटमार करणाऱ्या अशा रुग्णालयांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करुन ही रुग्णालये सील करावीत. अन्यथा भाजप आंदोलन छेडेल, असा इशाराही प्रविण दरेकर यांनी दिला. यावेळी आमदार भाई गिरकर, विनोद शेलार, बाबा सिंह, भाजपचे मंडल अध्यक्ष सुनिल कोळी, नरेंद्र राठोड, दिपक जोशी, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा- सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा