Advertisement

महिलेच्या छातीत घुसलेली सळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश

रुग्णालयातील डॉक्टरांनी सलग तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान अथक प्रयत्न करून महिलेच्या छातीतील सळई काढली.

महिलेच्या छातीत घुसलेली सळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश
SHARES

विक्रोळी पूर्व परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एक विचित्र अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडलेली सुमारे दीड फूट लांबीची सळई एका कामगार महिलेच्या छातीत आरपार घुसली. या महिलेवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया शीव इथल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात पार पडली.

रुग्णालयातील डॉक्टरांनी सलग तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान अथक प्रयत्न करून महिलेच्या छातीतील सळई काढली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनात ही अत्यंत अवघड कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.

समर्पित भावनेनं काम करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूचे आणि संबंधित परिचारिका, वॉर्डबॉय इत्यादी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी आणि उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर यांनी कौतुक केलं.

१९ जून रोजी विक्रोळी पूर्व परिसरात निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी एक पती-पत्नी कामगार म्हणून कार्यरत आहेत. यातील कामगार असणारी महिला खालच्या मजल्यावर आपले नेमून दिलेले बांधकाम विषयक काम करत होते. हे काम करत असतानाच साधारणपणे दुपारी ३ वाजताच्या सुमारास  वरच्या मजल्यावरून एक सळई पडली.

ही सळई दुर्दैवानं महिलेच्या छातीत आरपार घुसली. त्यानंतर या अत्यंत गंभीर अवस्थेतील महिलेला तात्काळ महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर सदर महिलेची गंभीर परिस्थिती बघून तिला शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हलवण्यात आलं.

महिलेच्या छातीत सळई आरपार घुसलेली असल्यामुळे या महिलेला शस्त्रक्रिया गृहातील (Operation Theatre) 'बेड'वर झोपवणेही शक्य होत नव्हतं. बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेस एका कुशीवर झोपवून ही शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. साधारणपणे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया रात्री १० वाजेपर्यंत म्हणजेच सलग ३ तास सुरू होती.

शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील ३ विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांचा समावेश असलेली १२ व्यक्तींचा चमू अथकपणे कार्यरत होती. अत्यंत अवघड शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि महिलेच्या छातीतून सळई यशस्वीपणे काढण्यात आली. या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.

ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणाऱ्या चमूमध्ये शल्यक्रिया विभागातील डॉक्टर विनीत कुमार, डॉक्टर रणजीत कांबळे, डॉक्टर पार्थ पटेल, हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर कुंतल सुराणा, भूलतज्ज्ञ डॉक्टर तेजस्विनी जांबोटकर यांच्यासह डॉक्टर प्राजक्ता पाटील, डॉक्टर अमेय, आणि परिचारिका श्रीमती तेजस्विनी गायकवाड आणि सहाय्यक भास्कर लहानगे यांचा समावेश होता, अशीही माहिती शल्यक्रिया विभागाचे प्रमुख आणि अधिष्‍ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली.


हेही वाचा

‘स्पुटनिक व्ही’ पुण्यात दाखल, 'या' तारखेपासून नागरिकांसाठी उपलब्ध

मुंबईनंतर ठाण्यातही बोगस लसीकरण, गुन्हा दाखल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा