Advertisement

मुंबईनंतर ठाण्यातही बोगस लसीकरण, गुन्हा दाखल

नौपाडा पोलिस ठाण्यात (Naupada Police) ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईनंतर ठाण्यातही बोगस लसीकरण, गुन्हा दाखल
SHARES

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही (Thane) बोगस लसीकरण (Bogus Vaccination) झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात (Naupada Police) ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या टोळीनं ११६ जणांना बोगस लस टोचून १ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केली असल्याचं समोर आले आहे. त्यातील ४ जणांना बनावट प्रमाणपत्रंही (Bogus Certificates) देण्यात आली आहेत.

मुंबईत बोगस लसीकरणाचे प्रकरण समोर आल्यानंतर यामध्ये अटकेत असलेल्या आरोपींनी ठाण्यातही हा कारनामा केल्याचं चौकशीत समोर आलं होतं. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी महेंद्र सिंग आणि त्याचे साथीदार श्रीकांत माने, संजय गुप्ता, सिमा अहुजा आणि करीम या टोळीनं २६ मे २०२१ रोजी लसीकरण केल्याची माहिती मिळाली. श्री जी आर्केडमधील रेन्यूबाय या कंपनीसाठी लसीकरण करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.

कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित या शिबिरात आरोपींनी बनावट डोस देत ते कोव्हिशिल्डचे डोस असल्याचं सांगितलं. यासाठी प्रत्येक लसीमागे १ हजार रुपये उकळण्यात आले. एकूण ११६ जणांच्या लसीकरणासाठी एक लाख १६ हजार रुपये वसुल करण्यात आले.

विशेष म्हणजे त्यातील चार जणांना कोव्हिशिल्ड लशीचे बनावट प्रमाणपत्रही यावेळी देण्यात आलं. मुंबई पोलिसांनी बनावट लसीकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर फसवणूक झालेल्या ‘रेन्युबाय डॉट कॉम’ या कंपनीचे क्लस्टर सेल मॅनेजर अर्णव दत्ता यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हे दाखल केलेत.

सध्या अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करून बोगस लसीकरण करण्याचे प्रकार वाढत आहेत. नागरिकांनी अशा लसीकरणासाठी पैसे देण्यापूर्वी त्या गोष्टीची खातरजमा करणं गरजेचं आहे. लसीकरण करून घेण्यापूर्वी ती लस कुठल्या हॉस्पिटलमार्फत देण्यात येत आहे, याची विचारणा करावी.

सोबतच हॉस्पिटलच्या अधिकृत नंबरवर फोन करून किंवा अधिकृत इमेलवर याबाबत विचारणा करावी. त्याची खात्री पटल्याशिवाय कुणालाही पैसे देऊ नयेत आणि कुणाकडूनही लसीकरण करून घेऊनये, असं आवाहन करण्यात आलं आहे.



हेही वाचा

अव्वल! महाराष्ट्राने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा

हिरानंदानी सोसायटीत झालेल्या लसीकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा