Advertisement

रस्त्यावरील बेघर, निराधार व्यक्तींचं नवी मुंबई महापालिकेकडून लसीकरण

नवी मुंबई महापालिकेने लसीकरण केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. यामध्ये कोणत्याही घटकाकडे दुर्लक्ष होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे.

रस्त्यावरील बेघर, निराधार व्यक्तींचं नवी मुंबई महापालिकेकडून लसीकरण
SHARES

कोरोना (coronavirus) च्या तिसऱ्या लाटेला सामोरे जात असताना लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण (corona vaccination) करण्याकडं नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे.  यासाठी पालिकेने लसीकरण केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. यामध्ये कोणत्याही घटकाकडे दुर्लक्ष होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात असून वृध्दाश्रम, अनाथाश्रमात असलेले बेडवरील रूग्ण, वृध्द तसंच दिव्यांग व्यक्ती यांच्याकरिता विशेष लसीकरण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

यामध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे डोक्यावर कोणत्याही प्रकारचे छप्पर अथवा निवारा नसणाऱ्या रस्ते, उड्डाणपुलाखालील जागा येथे आढळणा-या बेघर (homeless), निराधार व्यक्ती. असे दुर्लक्षित घटक लसीकरणापासून वंचित राहू नयेत याकडे नवी मुंबई (navi mumbai)  महापालिकेच्या वतीने बारकाईने लक्ष दिलं जात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील निराधार बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 

पुढील दहा दिवसात महानगरपालिकेच्या आठही विभागांत निराधार बेघरांसाठी कोव्हीड लसीकरणाची ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे.  बुधवारी बेलापूर विभागापासून लसीकरणास सुरूवात करण्यात आली. निराधार, बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेणारी नवी मुंबई ही पहिलीच महापालिका आहे.

मागील १५ दिवसांपासून या मोहिमेच्या नियोजनाचे काम सुरू करण्यात आलं आहे.  समाजविकास विभागातील समुह संघटकांमार्फत प्रत्येक विभागातील ८ ते १० ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. या ठिकाणांवर जाऊन लसीकरण करण्यासाठी डॉक्टर व नर्सेससह विशेष आरोग्य पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक निश्चित केलेल्या ठिकाणांवर रूग्णवाहिकेतून जाऊन समुह संघटकांनी त्या ठिकाणी एकत्र केलेल्या निराधार, बेघर व्यक्तींचे लसीकरण करत आहे.

या लोकांकडे कोणताही कागदपत्रांचा पुरावा नसल्याने मशीनव्दारे अशा व्यक्तींच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांच्या नावाची शासकीय पोर्टलवर एन्ट्री करण्यात येत आहे. हे बोटांचे ठसे त्यांच्या दुसऱ्या डोसवेळी ओळख पटविण्यासाठी महत्वाचे असणार आहेत.

लसीकरणासाठी आणलेल्या बेघर, निराधार व्यक्तीसाठी लसीकरणाची रूग्णवाहिका उभी असेल. त्याठिकाणी प्रथमत: हात धुण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यांच्याकरिता चहा, बिस्कीट व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर मशीनवर त्यांच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांच्या नावाची शासकीय पोर्टलवर रितसर नोंदणी करून त्यांचं लसीकरण केले जात आहे. त्यानंतर त्यांना 30 मिनीटे निरीक्षणासाठी थांबविण्यात येत आहे. 

त्याचवेळी त्यांना मास्कचा वापर करणे आणि इतर कोव्हीड सुरक्षा नियम पालनाविषयी माहिती दिली जात असून त्याचे पालन करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. ज बेलापूर विभागात विविध १९ ठिकाणी १०३ निराधार बेघर व्यक्तींचे लसीकरणाविषयी समुपदेशन करण्यात आले असून त्यामधील १४ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आलेलं आहे.

रेल्वे स्टेशन्स, उड्डाणपुलाखालील जागा, धार्मिक स्थळांबाहेरील जागा अशा बेघर, निराधार व्यक्ती आढळणा-या प्रत्येक विभागातील जागांचा समुह संघटकांमार्फत शोध घेण्यात आला असून त्याठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. या मोहीमेसाठी संकलित माहितीचा उपयोग समाजविकास विभागास यापुढील काळात लोक कल्याणकारी योजना राबविण्यासाठी होणार आहे. हेही वाचा -

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा