Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेची तयारी


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेची तयारी
SHARES

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी मुंबई पालिका खासगी रुग्णालयांच्या साह्याने १ लाख खाटांच्या सुविधेची तरतूद करत आहे. त्यामुळे भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयांत खाटांची कमतरता निर्माण होणार नाही, असे पालिकेने म्हटले आहे.

मुंबई पालिकेच्या रुग्णालयांत सध्या ३० हजार खाटा उपलब्ध असून रुग्ण वाढल्यास खासगी रुग्णालयांच्या साह्याने ही संख्या एक लाखापर्यंत वाढविण्याची तयारी पालिकेने केली आहे. मुंबईत करोनाच्या दुसऱ्यात लाटेत रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर खाटांची कमतरता जाणवली होती. तेव्हा पालिकेने रुग्णालयांसह कोरोना केंद्रातील खाटांची संख्या वाढवली होती. त्या अनुभवाच्या आधारे पालिकेने संभाव्य तिसऱ्या लाटेस तोंड देण्यासाठी खाटा वाढवितानाच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आदी यंत्रणाही सज्ज ठेवली आहे.

मुंबई पालिकेची सात जम्बो कोरोना केंद्रे असून त्यापैकी ४ केंद्रे सध्या कार्यान्वित आहेत. आवश्यकता भासल्यास उर्वरित केंद्रेही सुरू करण्यात येणार असून ती सुसज्ज आहेत. त्याचप्रमाणे ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करण्यावर भर दिला असून तिसरी लाट आल्यास ऑक्सिजन कमी पडणार नाही, याकडे पालिकेचे लक्ष आहे. 

मुंबईत सध्या रोज किमान ५० हजार कोरोनाप्रतिबंधक लशी दिल्या जात आहेत. लशींचा साठा वाढल्यास ही संख्या अधिक वाढू शकते. मुंबईत सध्या ३० हजार खाटा उपलब्ध असून त्यात केवळ ६०० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. गोरेगावमधील नेस्को-१ कोरोना केंद्रात २ हजार खाटा असून तिथे सध्या ४० रुग्ण आहेत. मुलुंड येथे केंद्रात १,५०० खाटा असून तिथे केवळ दोनच रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या कमी होतानाच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सोमवारी सांगितले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा