Advertisement

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मुंबईत फिरते केंद्र

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय आहे.

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मुंबईत फिरते केंद्र
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय आहे. त्यामुळं संपुर्ण मुंबईसह राज्यभरात लसीकरण केलं जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. त्यामुळं लसीकरणाला गती देण्यासाठी महापालिकेनं रुग्णवाहिका आणि फिरत्या लसीकरण केंद्रांद्वारे नागरिकांचे लसीकरण करण्याचं ठरवलं आहे. यासाठी पालिकेची यंत्रणा सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचणार आहे.

२ मात्रा घेतलेल्यांसाठी सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांचा लसीकरणाकडे ओघ वाढला होता. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण केंद्रांवरील गर्दी ओसरू लागली आहे. लसीकरण १०० टक्के झालेलं नाही. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिका आता स्वत:च लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

प्रत्येक लसीकरण केंद्राबरोबर काही ठरावीक सोसायट्या व झोपडपट्ट्या जोडलेल्या आहेत. त्यामुळं या केंद्रातील पथकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत १० ते १२ रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकांमधून ही पथके सोसायट्यांच्या दारी जाऊन सर्वाचे लसीकरण झाले आहे की नाही याची माहिती घेतील. तसंच, लसीकरण केंद्रापासून काही सोसायट्या किंवा वस्त्या लांब असतील तर त्यांच्या जवळ एखाद्या समाजमंदिरात किंवा सभागृहात शिबीर आयोजित करून लसीकरण केलं जाणार आहे. याच दरम्यान कोणी लस घेतली नसेल तर का घेतली नाही याची माहिती घेऊन त्यांचं मन वळवण्याचा, त्यांच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याचं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं.

ज्या सोसायट्यांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे अशा सोसायट्यांच्या दर्शनी भागात तसा फलक महापालिकेतर्फे लावला जात आहे. त्याकरिता सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. असा फलक लावण्याच्या मोहिमेमुळे कोणी लस घेतली नसेल तर त्यांची माहिती पुढे येण्यास मदत होत आहे.

अंधेरीमध्ये के पश्चिम विभाग कार्यालयाने बेस्टच्या एसी मिनी बसमध्ये फिरते लसीकरण केंद्र तयार केले आहे. यात डॉक्टर, नर्स, पालिका कर्मचारी, तसेच लसीकरणासाठी लागणारी यंत्रणा आहे. जुहू चौपाटी, प्रार्थना स्थळे, मार्केट, सोसायट्या अशा ठिकाणी जाऊन ही बस नागरिकांचं लसीकरण झाले की नाही हे तपासून त्यांचं लसीकरण करून देत असल्याचं समजतं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा