Advertisement

‘बर्ड फ्लू’ माणसांना होऊ शकतो का?

कोरोना या जीवघेण्या व्हायरसनंतर मुंबईसह देशभरात 'बर्ड फ्लू'नं शिरकाव केला आहे. देशातील १० राज्यांत 'बर्ड फ्लू' अर्थात 'एव्हियन एन्फ्लुएन्जा' फैलावल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘बर्ड फ्लू’ माणसांना होऊ शकतो का?
SHARES

कोरोना या जीवघेण्या व्हायरसनंतर मुंबईसह देशभरात 'बर्ड फ्लू'नं शिरकाव केला आहे. देशातील १० राज्यांत 'बर्ड फ्लू' अर्थात 'एव्हियन एन्फ्लुएन्जा' फैलावल्याचं स्पष्ट झालं आहे. 'बर्ड फ्लू'मुळं ८०० हून अधिक पक्षांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे पक्षांचा मृत्यू होण्यामुळं सर्वत्र घबराटीचं वातावरण पसरलं असून, नागरिकांनी सतर्कता बाळगण्यास सुरूवात आहे. शिवाय महापालिकेनं ही खबरदारीचा उपाय व नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

परभणी इथं अचानक ८०० कोंबड्यांच्या मृत्यूनंतर राज्यातही 'बर्ड फ्लू'चा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं. त्यापूर्वी ठाणे, चेंबूर इथंही सातत्यानं अचानक पक्षी मरून पडल्याचं समोर आलं. कोरोनानंतर अचानक आलेल्या 'बर्ड फ्लू'मुळं बर्ड फ्लूचा माणसांना धोका आहे का? चिकन आणि अंडी खाल्ल्यास बर्ड फ्लू होऊ शकतो का? बर्ड फ्लू माणसाला होऊ शकतो का? लहान मुलं किंवा वृद्ध नागरिकांना बर्ड फ्लूचा धोका आहे का? बर्ड फ्लू माणसाला झाल्यास त्याची लक्षणं कोणती? आणि नेमकी काय खबरदारी घ्यावी? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना सतावत आहेत.

'बर्ड फ्लू' म्हणजे काय?

'बर्ड फ्लू' हा विषाणूजन्य आजार आहे. इन्फ्लूएन्झा विषाणूचा पक्ष्यांमध्ये आढणारा प्रकार म्हणजे बर्ड फ्लू किंवा एव्हिअन फ्लू. फ्लूच्या विषाणूचे अनेक प्रकार आहेत. माणसाला फ्लू होतो ज्याला कॉमन फ्लू म्हटले जाते. तसेच पक्षी, डुक्कर, मांजर इतर प्राण्यांनाही फ्लूचा संसर्ग होतो. बर्ड फ्लू विशेषत: कुक्कुट, बदके यापासून प्रसारित होतो. १९९६ मध्ये चीनमध्ये या विषाणूची लागण झाली आणि १९९७ मध्ये हाँगकाँग इथं माणसांमध्ये याचा संसर्ग आढळला. त्यानंतर जवळपास ५० देशांत हा आजार पसरला. बर्ड फ्लू म्हणजे ‘एच ५ एन १’. त्यानंतर २०१३ मध्ये चीनमध्ये बर्ड फ्लूचा नवा प्रकार समोर आला तो म्हणजे 'एच ७ एन ९'.

माणसांना होऊ शकतो?

बदक आणि त्यासारख्या पाणपक्ष्यांच्या शरीरात हा विषाणू राहतो. या पाणपक्ष्यामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत्वे आतड्याला  व फूफुसाला होतो. बदक आणि इतर पाणपक्षी हे या विषाणूचे मूळ यजमान आहेत. - डॉ. शिवानी तांडेल.

'बर्ड फ्लू'ची लक्षणं

'बर्ड फ्लू' हा विषाणू प्राणी-पक्ष्यांकडून माणसांमध्ये पसरणारा आहे. त्याचा विषाणू हवेतून पसरतो. त्याची लागण झाल्यास साधारण २ ते ८ दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात. श्वास घेण्यात अडचण, कफ कायम राहणं, डोकेदुखी, सर्दी, घशात सूज येणं, स्नायू दुखणं, उलट्या, ओटीपोटात दुखणे अशा प्रकारची लक्षणं आढळल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

'अशी' घ्या काळजी?

  • अचानक खूप मृत पक्षी दिसल्यास त्यांना हात लावू नये. 
  • योग्य यंत्रणेला त्याची माहिती द्यावी. 
  • यंत्रणा पोहोचेपर्यंत कुत्री, मांजरी किंवा इतर प्राणी त्यांना खाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 
  • मृत पक्षी उघड्या कचरापेट्यांमध्ये न टाकता त्याची तातडीनं विल्हेवाट लावावी. 
  • ते खोलवर पूरून टाकावेत किंवा जाळून नष्ट करावते. 
  • पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. 
  • पक्ष्यांच्या संपर्कात आल्यावर काटेकोर स्वच्छता राखावी.
  • या विषाणूचा प्रादुर्भाव हा पोल्ट्रीमध्ये जास्त दिसतो.

चिकन, अंडी शिजवून खा

साधारणपणे चिकन शिजवूनच खाल्ले जाते. पूर्ण शिजलेले मांस, अंडी हे सुरक्षित असते. अधिक खबरदारीचा भाग म्हणून माहिती असलेल्या ठिकाणीच चिकन किंवा अंडी खरेदी करावी. अंडी घेतल्यानंतर साधारणपणे ती चांगली आहेत का हे अंडे पाण्यात टाकून पाहिले जाते. अंडे खराब आहे असे वाटल्यास खाऊ नये. पुरेशी काळजी घ्यावी मात्र, घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

घरातील प्राणी किंवा पक्ष्यांची अशी 'घ्या' काळजी

  • बाहेरील पक्षी किंवा प्राण्यांच्या संपर्कात घरातील प्राणी किंवा पक्षी नसतील तर काळजी करण्याचं कारण नाही. 
  • कुत्री किंवा मांजरी बाहेर फिरताना काही खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 
  • प्राण्यांनाही कच्चे किंवा अर्धेकच्चे मांस, अंडी देणं टाळावं. 
  • प्रक्रिया केलेल्या अन्नातून कोणत्याही विषाणूची बाधा होत नाही. 
  • पक्ष्यांची योग्य निगा राखावी. 
  • त्यांच्यात खूप बदल झाला, त्यांच्या हालचाली मंदावल्या असतील, प्रतिसाद मंदावला असेल, नेहेमीचं खाणं सोडलं असेल तर पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा.

मुंबई : हेल्पलाईन क्रमांक

मुंबई महानगरपालिकेकडून १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ठाणे : हेल्पालाईन क्रमांक

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२१०८ किंवा ०२२ - २५३७१०१० या क्रमांकावर पक्ष्यांच्या मृत्यूशी संबंधित तक्रारी दाखल करण्यासाठी नागरिक संपर्क साधू शकतात.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा