मुंबईत (mumbai) चिकुनगुनियाच्या प्रकरणांमध्ये (chikungunya cases) लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2024 दरम्यान 578 रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी तीन वर्षांतील सर्वाधिक प्रकरणे दर्शवतात. ज्यामुळे आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणांमध्ये अजून वाढ होऊ नये म्हणून त्वरित कारवाईची मागणी होत आहे. या आजारामध्ये झालेली वाढ ही स्वच्छतेचा अभाव, प्रदूषण आणि डास नियंत्रणाच्या अपुऱ्या उपाययोजनांमुळे झाली आहे.
2022 मध्ये शहरात चिकुनगुनियाची फक्त 18 प्रकरणे नोंदवली गेली होती. जी 2023 मध्ये 250 वर पोहोचली होती. मात्र सध्याच्या चालू वर्षात चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये आणि लक्षणांमध्येही वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2024पर्यंत चिकुनगुनियाची प्रकरणे 578 वर पोहोचली आहेत.
आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, मान्सूनच्या लांबलचक पावसामुळे डासांच्या प्रजननासाठी तयार झालेली अनुकूल परिस्थिती या वाढीस मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे.
पावसाळ्यात बांधकामाची ठिकाणे, टाकून दिलेले कंटेनर आणि ताडपत्रिंनी झाकलेली ठिकाणं अशा अनेक भागात पाणी साचते. चिकुनगुनिया विषाणूचा प्रसार करणाऱ्या एडिस डासांच्या प्रजननासाठी ही साचलेल्या पाण्याची ठिकाणे अनुकूल आहेत.
बांधकामाची ठिकाणे डासांच्या (mosquitoes) प्रसारासाठी हॉटस्पॉट म्हणून ओळखली गेली आहेत. महापालिकेचे आरोग्य अधिकाऱ्यांनी कंत्राटदार आणि रहिवाशांना साचलेले पाणी काढून टाकण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी वारंवार सांगत असते.
चिकुनगुनिया हा आजार डासांच्या चावण्याने पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. उच्च ताप, तीव्र सांधे आणि स्नायू दुखणे, डोकेदुखी, पुरळ आणि थकवा यासारखी अनेक लक्षणे दिसून येतात. मात्र या वर्षी डॉक्टरांनी अधिक गंभीर लक्षणे नोंदवली आहेत.
अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. अनेक रुग्णांना दीर्घकाळापर्यंत सांधेदुखी होत आहे. ज्यामुळे रुग्णांच्या दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम होत आहे.
लहान वयोगटातील रुग्ण सामान्यत: 10 ते 12 दिवसांत बरे होतात. मात्र प्रौढांना आणि वृद्धांना बरे होण्यास जास्त वेळ लागतो. या वयोगटातील रुग्णांची सांधेदुखी आणि थकवा यासारखी दीर्घ लक्षणे दोन महिन्यांपर्यंत टिकून राहतात.
अनेक आव्हाने असूनही आरोग्य तज्ञ चिकुनगुनिया टाळता येण्याजोगा आहे यावर भर देत आहेत. ते डासांच्या उत्पत्तीचा सामना करण्यासाठी सोप्या परंतु प्रभावी उपायांची शिफारस करत आहेत. जसे की साठवून ठेवलेले पाणी झाकून ठेवणे, नाले साफ करणे आणि डासप्रतिबंधक किटकनाशके वापरणे.
हेही वाचा