Advertisement

महापालिका कार्यालयांत आरटीपीसीआर चाचणीशिवाय प्रवेश बंदी

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारनं दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी सुरू केली आहे.

महापालिका कार्यालयांत आरटीपीसीआर चाचणीशिवाय प्रवेश बंदी
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारनं दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी सुरू केली आहे. मंत्रालयात अभ्यगतांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, पालिका मुख्यालयात व २४ विभाग कार्यालयात अभ्यगतांना प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत. ज्या नागरिकांकडे ४८ तास अगोदर केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असेल फक्त त्यालाच पालिकेत प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे तसा अहवाल नसेल त्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबतची जबाबदारी सर्व खातेप्रमुख, सहाय्यक आयुक्त यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

कोरोना रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होताना आढळून आले आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं ५ एप्रिलपासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी तर सकाळी ७ पासून ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. मुंबई पालिकेच्या मुख्यालयासह सर्व २४ विभाग कार्यालयात विविध कामांसाठी नागरिक दररोज गर्दी करीत असतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता पालिका प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळं महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन कोरोनाला आळा घालण्यासाठी, पालिका मुख्यालय आणि २४ विभाग कार्यालयात नागरिकांना नेहमीप्रमाणे प्रवेश देण्यास बंदी आदेश जारी केले आहेत.

सर्व ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन निर्बंध लागू असेपर्यंत नागरिकांना यापैकी कोणत्याही कार्यालयात प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले आहेत. केवळ लोकप्रतिनिधी, कर्मचारी-अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात आहे. लोकप्रतिनिधींसह अन्य महापालिका कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत तातडीचे काम असल्यास ऑनलाईन माध्यमातून बैठक घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

पालिका खाते प्रमुख, विभाग प्रमुख आदींनी केवळ अपवादात्मक परिस्थितीत नागरिकांच्या ४८ तासांतील ‘आरटीपीसीआर’ अहवाल निगेटिव्ह असल्याचे तपासून व त्याबाबतची खात्री करून मगच पालिकेत प्रवेश द्यावा, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. त्याचप्रमाणे, कोरोनाचा प्रादुर्भाव पालिका मुख्यालयात वा पालिका विभाग कार्यालयात वाढू नये यास्तव, दैनंदिन टपाल, इतर महत्त्वाच्या कामांसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी मुख्यालय, विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच टपाल स्वीकारण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करोना लसीकरण करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा