Advertisement

आता 'या' चाचण्यांचे अहवाल महापालिकेला होणार सादर


आता 'या' चाचण्यांचे अहवाल महापालिकेला होणार सादर
SHARES

कोरोनाबाधित झाल्याचे समजल्यावर लक्षणे नसली तरी रुग्ण परस्पर रुग्णालयात दाखल होण्यासाठी घाई करत असल्याचे चित्र कोरोना उद्रेकाच्या काळात दिसत होते. यावर उपाय म्हणून पालिकेने आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल रुग्णांना न देता विभागीय नियंत्रण कक्षाला कळविण्याचे निर्बंध खासगी प्रयोगशाळांना घातले होते. मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असून, महापालिकेनं ठिकठिकाणी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय, आरोग्यव्यवस्थेत ही वाढ करण्यात आली आहे. 

वेळेत उपचारासह रुग्णांचे विलगीकरण करण्यासाठी आरटीपीसीआरसह आता प्रतिजन चाचण्यांचे अहवालही रुग्णांना न देता थेट महापालिकेला सादर करण्याचे आदेश पालिकेने खासगी प्रयोगशाळांना दिले आहेत. त्यामुळे प्रतिजन चाचण्याच्या माध्यमातून तासाभरात निदान करण्याची सुविधा असली तरी पालिकेने संपर्क करेपर्यंत रुग्णांना वाट पाहावी लागणार आहे.

मुंबईत पुन्हा संसर्गाची तीव्रता वाढल्यावर सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये पालिका आयुक्तांनी हे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या. यासह आता प्रतिजन चाचण्यांचे अहवालही रुग्णांना न देता विभागीय नियंत्रण कक्षाना देण्याचे आदेश खासगी प्रयोगशाळांना दिले आहेत.

आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल येण्यास २४ तासांहून अधिक कालावधी लागतो. यावर उपाय म्हणून प्रतिजन चाचण्या सुरू केल्या. या चाचण्यांच्या अचूकतेबाबत पूर्णत: खात्री नसली तरी तातडीने निदान करण्यास फायदेशीर ठरत आहेत. परंतु आता चाचणी अहवाल तासाभरात उपलब्ध झाला तरी तो रुग्णाला पाहता येणार नाही. बाधित असलेल्यांचे अहवाल खासगी प्रयोगशाळांकडून विभागीय नियंत्रण कक्षाला पाठविले जातील.

कक्षाच्या माध्यमातून संबंधित रुग्णांना त्याची माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे अहवाल लवकर आला तरी पालिकेच्या फोनची वाट पाहण्याशिवाय रुग्णांना पर्याय नाही.

आपत्कालीन स्थितीत किंवा शस्त्रक्रिया अन्य उपचारापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तातडीने निदान करण्यासाठी खासगी रुग्णालयांसह अनेक ठिकाणी प्रतिजन चाचण्यांचा वापर सध्या केला जात आहे. परंतु यांचे अहवाल प्राप्त होण्यास कोणत्या ना कोणत्या मार्गाने उशीर होणार असेल तर चाचण्यांचा मूळ उद्देशच सफल होत नाही, असे मत खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केले.

सिटी स्कॅन किंवा क्ष-किरण चाचणीतून निदान झालेल्या रुग्णांच्या अहवालाबाबात मात्र कोणतेही नियम ठरविलेले नाहीत, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

प्रतिजन चाचण्यांमधून बाधित रुग्णाला नंतर शोधणे अडचणीचे होते. अशा वेळी विभागीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून संपर्क झाल्यास पुढील नियोजन योग्य रीतीने केले जाईल. अहवाल आल्यानंतर लगेचच रुग्णांशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना बराच काळ वाट पाहावी लागणार नाही. बाधित नसल्यास लगेचच अहवाल दिला जाईल.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा