Advertisement

जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात- महापालिका आयुक्त

जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश येईल, असा दावा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी केला.

जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात- महापालिका आयुक्त
SHARES

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका विविध उपाययोजना करत आहे. परिणामी यामुळं मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता ३६ दिवसांवर पोहोचला आहे. तसंच, मुंबईत सुरूवातील हॉटस्पॉट ठरलेली ठिकाणं आता नियंत्रणात येत आहे. दुपटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असलेल्या विभागांमध्ये शीघ्रकृती कार्यक्रम राबविण्याचं महापालिकेनं निश्चित केलं आहे. त्यामुळं जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश येईल, असा दावा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी केला.

टेस्टिंग, ट्रॅकिंग, क्वारंटाइन आणि ट्रीटमेंट या सूत्राचा अवलंब महापालिकेनं केला आहे. वैद्यकीय प्रयोगशाळांना २४ तासांच्या आत कोरोना रुग्णांचा अहवाल देणं बंधनकारक करण्यात आलं. त्यानंतर कोरोना उपचार केंद्र व रुग्णालयं यांची क्षमता वाढविण्यात आली. मे महिन्यातील ३ हजार ७०० रुग्णशय्यांच्या तुलनेत सध्यस्थितीत रुग्णालयांमध्ये १२ हजार खाटा उपलब्ध आहेत. जूनअखेरपर्यंत १५ हजार तर जुलै अखेरपर्यंत २० हजार रुग्णशय्या उपलब्ध असतील, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

खाटांची संख्या वाढवताना डॉक्टर्सची संख्याही वाढवली. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात पाचपट वाढ करतानाच महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये संसर्ग कमी आहे अशा भागातून डॉक्टरांना मुंबईत आणले. मे महिन्यातील १०० च्या तुलनेत रुग्णवाहिकांची संख्या आता ७०० पर्यंत पोहोचली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईत ३ जून ते २२ जून २०२० म्हणजे मागील १९ दिवसात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आहे. एका बाजूला मुंबईतील स्थिती नियंत्रणात येत असताना दहिसर, बोरिवली, मालाड, कांदिवली, मुलुंड, भांडूप अशा विशिष्ट ६ ते ७ विभागांमधून अद्याप मुंबईच्या एकूण रुग्णसंख्येच्या निम्मे रुग्ण आढळत आहेत. त्यासाठी फिरते दवाखाने अर्थात मोबाईल डिस्पेंसरी व्हॅनच्या माध्यमातून या विभागांच्या सर्व परिसरांमध्ये पोहोचून तपासणी वाढवण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये वॉर्ड वॉररूम तयार केल्यानं आता पालिका स्वत: पॉझिटिव्ह रुग्णांपर्यंत पोहोचते, त्यांच्याशी संपर्क आणि सुसंवाद साधून सर्व समस्यांचं निराकरण करीत आहे. या सर्व प्रयत्नांमुळं रुग्णालयांमधील सुमारे अडीच हजार कोविड बेड रिकामे आहेत. तर १,३०० आयसीयू रुग्णशय्यांपैकी ७१ रिकामे आहेत. याच पद्धतीने कामगिरी होत राहिली तर जुलै मध्यापर्यंत मुंबईतील कोविड संसर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रणात असेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.



हेही वाचा -

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली

दारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा