Advertisement

आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडासाेबत शिक्षाही होणार

राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसंच अन्य तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यास दंडासह शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडासाेबत शिक्षाही होणार
SHARES

राज्यात सार्वजनिक ठिकाणी  तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसंच अन्य तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यास दंडासह शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. शिवाय धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देखील राज्य सरकारने (maharashtra government bans spitting tobacco products at public places with strict punishment) घेतला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून कोरोनासंबंधी उपाययोजनेची माहिती देण्यासाठी जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे अनेक संसर्गजन्य व प्राणघातक आजार पसरतात. कोरोनाचा संसर्ग थुंकीच्या माध्यमातून देखील होत असल्याचं निष्पन्न झाल्याने जनतेच्या हितासाठी हा कडक निर्णय घेण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा - Coronavirus Pandemic: मुंबईत 1437 नवे रुग्ण, दिवसभरात 38 जणांचा मृत्यू

राज्यात सर्वत्र

या निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठी साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यामधील तरतुदींनुसार राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसंच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासन निर्णयातील आदेश राज्यात सर्वत्र लागू राहतील, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

अशी असेल शिक्षा

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धुम्रपान करणाऱ्यास मुंबई पोलीस अधिनियमानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड व ५ दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे.

भारती दंड संहितनेनुसार विविध कलमांनुसार ६ महिने, २ वर्ष शिक्षा व दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये किंवा धुम्रपान करू नये असं, आवाहन देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा