मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी बाहेर येताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे. त्यामुळे पुढचे १४ दिवस महापौर पेडणेकर या आपल्या निवासस्थानातच राहणार आहेत. महापौरांची कोविड-१९ चाचणी करण्यात आली असून त्यांचं निवासस्थानही सॅनेटाईज केलं जात आहे.
टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि मंत्रालयातील पत्रकार संघाच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकांराच्या कोरोना चाचणीसाठी महापालिकेला विशेष कॅम्प आयोजित करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार मुंबई प्रेस क्लबजवळ या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. १६ आणि १७ एप्रिल रोजी पत्रकार आणि कॅमेरामन अशा १६८ जणांच्या कोरोना (corona test) चाचण्या घेण्यात आल्या. यातील ५३ पत्रकारांच्या कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्या आहेत. तर काही पत्रकारांच्या कोरोना चाचण्यांचा अहवाल अजून यायचा आहे.
हेही वाचा - मुंबईतील ५३ पत्रकारांनाही कोरोनाची लागण
महापौर यापैकी काही पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या, तर काही पत्रकार महापौरांच्या निवासस्थानी देखील गेले होते. पत्रकारांची कोविड-१९ चाचणी पाॅझिटिव्ह आल्याचं समजताच महापौरांची देखील त्वरीत कोविड-१९ चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल अजून यायचा आहे. त्यामुळे महापौरांनी स्वत: होम क्वारंटाईन करुन घेण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार महापौर पुढील १४ दिवस निवासस्थानीच राहतील.
याशिवाय मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील २ कर्मचाऱ्यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील करण्यात आलं आहे. कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या दोघांवर उपचार करण्यात येत असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही माहिती घेण्यात येत आहे. या सर्वांचा शोध घेऊन त्यांना लक्षणांनुसार क्वारंटाईन करण्यात येणार आहे.