Advertisement

आता, सार्वजनिक ठिकाणी थुंकाल तर…

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करणाऱ्या महाराष्ट्राच्या कायद्याची अधिक प्रभावी अमंलबजावणी राज्यात केली जाईल, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

आता, सार्वजनिक ठिकाणी थुंकाल तर…
SHARES

कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने या आजाराला आळा घालण्यासाठी स्वच्छताविषयक काळजी घेण्याचं आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत सातत्याने केलं जात आहे. त्याअनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करणाऱ्या महाराष्ट्राच्या कायद्याची अधिक प्रभावी अमंलबजावणी राज्यात केली जाईल, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारण्याची सवय असणाऱ्यांना आता तोंड आवरतं घ्यावं लागणार आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास, महाराष्ट्रातील रेड झोन मधील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त देखील उपस्थित होते.

कोरोनाबाधित व्यक्तीच्या लाळेतील विषाणू २४ तासांपेक्षा जास्त काळ जीवंत राहून तो अन्य व्यक्तींमध्ये संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्र पाठवल्यानंतर राज्य सरकारनेही सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्यास मनाई केली आहे. 

हेही वाचा - मुंबईत रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता

लॉकडाऊन करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गृह मंत्रालयाने सर्व जिल्हा प्रशासनप्रमुख, महापालिकांना दारू, तंबाखू आणि गुटखा आदी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालतानाच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई केली आहे. परंतु या नियमांची कडक अंमलबाजवणी होतेय, असं सध्यातरी ठामपणे सांगता येणार नाही. त्याकडे पाहता महाराष्ट्राने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करणारा कायदा केला असून त्याची अधिक प्रभावी अमंलबजावणी राज्यात केली जाईल, असं आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना राजेश टोपे यांनी दिलं.

दरम्यान, जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत मात्र ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना रेल्वेने खास तयार केलेल्या रेल्वे डब्यातील विलगीकरण कक्षात ठेवले जाण्याबाबत यावेळी चर्चा झाली. गरज भासल्यास त्याचा वापर करावा या संदर्भात रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केली जाईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत जो प्रोटोकॉल आहे तो बदलण्याचा विचार आयसीएमआरच्या स्तरावर सुरू आहे. लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल. कोरोना सोबतच अन्य आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर उपचार मिळाले पाहिजेत यासाठी राज्यात प्रयत्न करण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांनी आपला आजार लपवू नये यासाठी विशेष करून वर्तणुकीतील बदलाबाबतच्या संवादासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येईल, असंही टोपे म्हणाले.

हेही वाचा - Coronavirus Updates: राज्यात आतापर्यंत ३ हजार कोरोनाबाधित रुग्ण बरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा